यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज; 'या' दिवशी रंगणार नाटकाचा पहिला प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 06:16 PM2023-07-19T18:16:34+5:302023-07-19T18:19:23+5:30
Yashwantrao Natya Sankul: यशवंतराव नाट्य संकुलनाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम सुरु होतं
गेल्या काही दिवसांपासून यशवंतराव नाट्य संकुलनाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम सुरु होतं. त्यामुळे नाट्यरसिकांना नवनवीन कलाकृतींचा आस्वास घेता येत नव्हता. अखेर या इमारतीच्या नुतनीकरणाचं काम पूर्ण झालं असून येत्या १ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या सेवेत हे नाट्यगृह पुन्हा सुरु होणार आहे. सदर संस्थांनी प्रयोग करण्यासाठी नाट्य संकुल व्यवस्थापकांकडे रितसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले ह्यांनी केले आहे.
आधुनिक, अद्ययावत अशा या नाट्य संकुलात सुरेख अंतर्गत सजावट, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रंगमंच, ध्वनियंत्रणा, स्वछतागृह आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोबत या नव्या वास्तूमध्ये पार्किंग स्लॉटची खास व्यवस्था करण्यात आली आहे. ३० मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरु झाले होते. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर प्रशांत दामले, नवीन कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले. याच प्रयत्नांमुळे येत्या १ ऑगस्ट पासून हे नाट्य संकुल सज्ज होत आहे.
नव्याने दिमाखात सुरु झालेलं हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच, रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिलं आहे.