"नंतर तू इथे परत येशील...", लग्नाआधी मकरंद अनासपुरेंच्या पत्नीला वडिलांनी दिलेली ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:30 IST2025-03-13T12:29:59+5:302025-03-13T12:30:49+5:30
Makarand Anaspure : अभिनेता मकरंद अनासपुरे यांना इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनी अनेक नाटकात आणि चित्रपटात काम केले. या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी शिल्पा यांची साथ लाभली.

"नंतर तू इथे परत येशील...", लग्नाआधी मकरंद अनासपुरेंच्या पत्नीला वडिलांनी दिलेली ताकीद
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. अभिनेत्याला इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनी अनेक नाटकात आणि चित्रपटात काम केले. या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी शिल्पा यांची साथ लाभली. त्यादेखील अभिनेत्री आहेत. मात्र आता त्या इंडस्ट्रीपासून दुरावल्या आहेत. मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे यांचे लव्हमॅरेज आहे. २००१ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांचे आंतरजातीय लग्न आहे. मात्र दोघांच्या घरातून विरोध झाला नाही. परंतु शिल्पा यांच्या वडिलांनी त्यांना तू त्याच्यासोबत संसार करू शकणार नाहीस असं सांगितलं होतं. यामागे काय कारण आहे, ते जाणून घेऊयात.
जाऊबाई जोरात या नाटकाच्या सेटवर शिल्पा आणि मकरंद अनासपुरे यांची भेट झाली होती. ते दोघे एकमेकांना पसंत करत होते. मग एक दिवशी ते शिल्पा यांच्या वडिलांना भेटायला गेले. शिल्पा यांच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. मात्र त्यावेळी मकरंद यांच्याकडे राहायला घरही नव्हते. मकरंद शिल्पा यांच्या वडिलांशी बोलले. सगळे बोलणे झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील मुलीला म्हणाले, ''शिल्पा मुलगा खूप चांगला वाटला. तो तुला खूप सांभाळून घेईल. तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाहीस. फार फार तर तू दोन महिने त्याच्यासोबत राहशील आणि नंतर तू परत येशील. सुरुवातीला प्रेमापोटी तू म्हणशील की हा मी खूश आह, खूश आहे. पण नंतर तू त्याला म्हणशील की माझ्या घरी तर असं होतं, तसं होतं. त्याच्या डोक्याला ताप होईल. तू नाही जमणार हे.''
वडिलांनी असं सांगितल्यानंतर शिल्पा यांनी मकरंद अनासपुरेंसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते २००१ साली विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर त्या दोघांमध्ये थोडेफार खटके उडाले पण त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. आज ते आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत.