'धुमधडाका' सिनेमासाठी लक्ष्मीकांत बेर्डेने घेतले होते इतके मानधन, वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 09:00 AM2021-09-14T09:00:00+5:302021-09-14T09:00:00+5:30

‘लक्ष्मीकांत-महेश कोठारे- अशोक सराफ’ हे विनोदी सिनेमाचं सार बनलं होतं. त्याचवेळी ‘लक्ष्या-सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ’ या त्रिकूटालाही रसिक प्रेक्षकानं डोक्यावर घेतलं.

You Wont Believe to know the fees asked by Laxmikant Berde for Marathi Movie Dhumdhadaka, check here | 'धुमधडाका' सिनेमासाठी लक्ष्मीकांत बेर्डेने घेतले होते इतके मानधन, वाचून बसणार नाही विश्वास

'धुमधडाका' सिनेमासाठी लक्ष्मीकांत बेर्डेने घेतले होते इतके मानधन, वाचून बसणार नाही विश्वास

googlenewsNext

रसिकांना त्याने खळखळून हसवलं,रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं.मराठी असो किंवा हिंदी सिनेमा,त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्ष: वेड लावलं. केवळ कॉमेडीच नाही तर कोणत्याही भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे साऱ्यांचा लाडका 'लक्ष्या'. लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेने आपल्या अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसायला लावलं,त्यांचं मनोरंजन केलं.मात्र या जगातून लक्ष्याची अचानक एक्झिट झाली आणि साऱ्या  रसिकांच्या डोळ्यात पाणी आलं. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्याने रसिकांचं मनोरंजन केलं.

साऱ्यांचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यानं सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. १९८५ साली आलेल्या ‘धुमधडाका’ सिनेमातून लक्ष्यानं खऱ्या अर्थानं धुमधडाकाच केला. पण तुम्हाला माहिती आहे का? धुमधडाका सिनेमासाठी लक्ष्मीकांत बेर्डेला केवळ १ रुपया मानधनाच्या रुपात मिळाला होता.

वाचून आश्चर्य वाटले असणार पण  महेश कोठारे आपला पहिल्याच सिनेमाचे दिग्दर्शन करत होते, सिनेमा बवनण्यासाठी त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यांनी 'धुमधडाका' सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी लक्ष्याला केवळ एक रुपया देत भूमिका साकारण्यास सांगितले होते. लक्ष्मीकांतचा मोठेपणा त्यांनंही एक रुपया स्विकारला आणि सिनेमातून सगळ्यांची मनं जिकंली. 

कारण या सिनेमातून लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे ही ‘त्रयी’ पहिल्यांदाच एकत्र आली. यांत तिघांच्या अभिनयाची भट्टी अशी काय जमली की नंतरच्या काळात महेश कोठारे यांनी लक्ष्याला घेऊन सिनेमांचा धडाकाच लावला. लक्ष्या आणि अशोक सराफ हे महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमाचं जणू समीकरणच बनलं. त्यांच्या चित्रपटांमधून लक्ष्यानं खऱ्या अर्थानं यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. 'धुमधडाका'नंतर ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधून ‘लक्ष्या-महेश’ची जादू पाहायला मिळाली.

‘लक्ष्मीकांत-महेश कोठारे- अशोक सराफ’ हे विनोदी सिनेमाचं सार बनलं होतं. त्याचवेळी ‘लक्ष्या-सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ’ या त्रिकूटालाही रसिक प्रेक्षकानं डोक्यावर घेतलं. ‘भूताचा भाऊ’, ‘आयत्या घरात घरोबा’ या आणि अशा अनेक चित्रपटात या तिघांची धम्माल रसिकांनी एन्जॉय केली. त्यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’ वर प्रेक्षक अक्षरक्षा फिदा झाले. महेश कोठारे म्हणा किंवा सचिन पिळगांवकर म्हणा या प्रत्येकाशी लक्ष्याचं चांगलं जमलं. पडद्यावरील अभिनेता दिग्दर्शक नात्यासोबतच प्रत्यक्ष जीवनातही त्यांची घट्ट मैत्री होती. 

Web Title: You Wont Believe to know the fees asked by Laxmikant Berde for Marathi Movie Dhumdhadaka, check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.