"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 07:30 PM2024-05-10T19:30:41+5:302024-05-10T19:31:14+5:30
Prajakta Mali : प्राजक्ताने अक्षय तृतियाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असते. प्राजक्ताने अक्षय तृतियाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. प्राजक्ता माळी 'फुलवंती' चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहेत. ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून प्राजक्ता यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना असेच प्रेम करत राहण्याची विनंती केली आहे.
प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, आज “अक्षय्य तृतीया”… अक्षय्य - अर्थात ज्याला क्षय नाही. अविनाशी… आजच्या तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं मी भारावून गेले. आज देवाकडे हेच मागेन की, तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम “अक्षय” राहो. त्याचप्रमाणे आम्हां फुलवंती संचाचं पॅनोरमावरचं, त्याचं आमच्यावरच प्रेमही अक्षय राहो. ही जोडली गेलेली रेशीमगाठ अक्षय राहो. तुमच्या आयूष्यातील सुख, शांती, धन-धान्य, संपत्ती अक्षय राहो. जगू सौख्यभरे! सगळ्यांना फुलवंती संचाकडून अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्राजक्ताचे चाहते या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
या नव्या प्रवासाबद्दल प्राजक्ता म्हणाली की, फुलवंती सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. 'फुलवंती' चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन,असा विश्वास मला आहे.
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कं आणि शिवोsहम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.