Zol Zaal Movie Review : जाणून घ्या कसा आहे, मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल'?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 05:02 PM2022-07-02T17:02:16+5:302022-07-02T17:02:43+5:30

Zol Zaal Movie Review: मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल' नुकताच प्रदर्शित झाला. जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट?

Zol Zaal Movie Review: Find out how is the multi starrer movie 'Zol Zaal'? | Zol Zaal Movie Review : जाणून घ्या कसा आहे, मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल'?

Zol Zaal Movie Review : जाणून घ्या कसा आहे, मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल'?

googlenewsNext

कलाकार : अमोल कागणे, प्रीतम कागणे, ईशा अगरवाल, रितुराज फडके, अजिंक्य देव, मनोज जोशी, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सुप्रिया कर्णिक, उदय नेने, उदय टिकेकर
लेखक - दिग्दर्शक : मानस कुमार दास
निर्माता : संजना अगरवाल, विनय अगरवाल, गोपाळ अगरवाल, रश्मी अगरवाल
शैली : कॅामेडी ड्रामा
कालावधी : २ तास १५ मिनिटे
स्टार - दोन स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे

'झोलझाल है भाई सब झोलझाल है...' असंच काहीसं या चित्रपटाचं झालं आहे. सर्वच विभागांमध्ये झोल झाल्यानं हा चित्रपटच एक झोलझाल बनला आहे. लेखनापासून अभिनयापर्यंत आणि सादरीकरणापासून दिग्दर्शनापर्यंत सर्वच बाबतीत ढिसाळ कामगिरी पहायला मिळते. लेखक-दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी यापूर्वी बऱ्याचदा मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलेला फॉर्म्युला वापरून हा चित्रपट बनवला. नाविन्याचा अभाव असलेला हा चित्रपट रसिकांच्या अपेक्षांचा झोलझाल करणारा वाटतो.

कथानक : एनआरआय बळवंत पाटील यांचा ६०० कोटी रुपये किंमतीच्या महालाची ही कथा आहे. जय आणि वीरू ही दोन मुलं असणाऱे बळवंत अमेरिकेतच रहात असतात. भारतातील भव्य दिव्य महालात केवळ त्यांची कुत्री आणि एक नोकर रहात असतो. एकीकडे बिल्डर दीक्षितचा या महालावर डोळा असतो, तर दुसरीकडे कुख्यात डॅान दादाऊदलाही हा महाल हवा असतो. तिकडे मंत्री रावसाहेबांनाही या महालाचा आश्रम बनवायचा असतो, पण बळवंत यांना महाल विकायचा नसतो. एक दिवस अचानक बळवंत जय-वीरूसोबत भरतात परततात आणि महाल विकण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर खऱ्या अर्थानं झोलझाल सुरू होतो.

लेखन-दिग्दर्शन : विषयात जराही नावीन्य नाही. पटकथेत आश्चर्यकारक ट्वीस्ट अँड टर्न्सचा अभाव जाणवतो. पडद्यावर जे दाखवलंय ते प्रभावीपणे पाहणाऱ्याच्या मनावर ठसवण्याची कला दास यांना नीटशी जमलेली नाही. घासून गुळगुळीत झालेला फॅार्म्युला यात असल्यानं पुढं काय घडणार हे अगोदरच समजतं. सुमार दर्जाचे संवाद आणि प्रसंग कंटाळा आणतात. चित्रपट सुरू झाल्यानंतर १०-१५ मिनिटांमध्येच कथानकाचा अंदाज येतो. पडद्यावर अगदी तसंच घडतं. त्यामुळं पुढं पाहण्याची उत्सुकता रहात नाही. मराठीतील नामवंत कलाकारांची उपस्थिती असणं हीच काय ती या चित्रपटाची जमेची बाजू आहे. जय-वीरूची नायिकांशी भेट एका टुकार अपघातात होते आणि श्रीमंत घरच्या दोघीही लगेच सायकलवरून जाणाऱ्या नायकांच्या प्रेमात पडतात. लगेच डान्सच्या स्पर्धेत एक लाखांचं बक्षीसही जिंकतात. त्यांच्या वडीलांचा म्हणजेच मंत्री रावसाहेबांचाही महालावर डोळा असतो. महाल विकायचं ठरल्यावर मृत्यूपत्राचा मुद्दा आणणं, विकत घेणाऱ्यांनी न वाचता अॅग्रिमेंट साईन करणं या सर्व गोष्टी न पटण्याजोग्या आहेत. या सर्वांमध्ये रोझीच्या बोल्ड अभिनयाचा कहर बघवत नाही. चित्रपटाची लांबी जास्त नसणं हीच काय ती दिलासादाक बाब आहे. गीत-संगीताची बाजू सामान्यच आहे. 'एक नंबर...' गाणं चांगलं वाटतं. सिनेमॅटोग्राफी, कॅास्च्युम, कला दिग्दर्शन या तांत्रिक बाबी ठिकठाक आहेत.

अभिनय : पटकथेत बोंब असली तरी कलाकारांनी प्रतिभेला साजेसा अभिनय केला आहे. मनोज जोशींचा डबल रोल छान झाला आहे. अमोल कागणे आणि रितुराज फडके जरी नायकाच्या भूमिकेत असले तरी त्यांना अद्याप खूप काही शिकावं लागणार आहे. प्रीतम कागणे आणि ईशा अगरवाल यांना फार वाव नव्हता. छोट्याशा भूमिकांमध्येही त्या आपला ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. उदय नेनेनं साकारलेला मामा आणि मंगेश देसाई रंगवलेला बिल्डर छान झाला आहे. कुशल बद्रिकेनंही दादाऊदच्या भूमिकेत रंग भरण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. रोझीच्या रूपात अलिशा फेरारनं मांडलेला उच्छाद मुकाटपणे पहावा लागतो. मास्टरमाईंड अजिंक्य देव कन्फ्युज करणारा आहे. भारत गणेशपुरेनं नेहमीच्या स्टाईलमध्ये नोकर साकारला आहे. उदय टिकेकर, सुप्रिया कर्णिक, विश्वजीत सोनी यांचंही काम ठिकठाक आहे.

सकारात्मक बाजू : कलाकारांचा अभिनय आणि एक गाणं चांगलं झालं आहे. 

नकारात्मक बाजू : अतिशय मंद गती असलेला हा चित्रपट सुरुवातीपासूनच कंटाळवाणा वाटतो.

थोडक्यात : शीर्षकावरून 'हेराफेरी'सारखा एव्हरग्रीन सिनेमा मिळेल अशी अपेक्षा ठेवून जाल तर फसगत होण्याची शक्यता आहे. खूपच मोकळा वेळ असेल आणि काहीच टाईमपास नसेल तर हा पर्याय निवडायला हरकत नाही.

Web Title: Zol Zaal Movie Review: Find out how is the multi starrer movie 'Zol Zaal'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.