दिलीप प्रभावळकरांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा करणार अनोखा प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:00 PM2024-10-28T19:00:54+5:302024-10-28T19:01:50+5:30

अष्टपैलू रंगकर्मी दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा काही तरी नवीन करायला जात आहेत. 

Marathi Dilip Prabhavalkar Will Performe Play Patra Patri In Royal Opera House Mumbai | दिलीप प्रभावळकरांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा करणार अनोखा प्रयोग!

दिलीप प्रभावळकरांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा करणार अनोखा प्रयोग!

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेता म्हणजे दिलीप प्रभावळकर. नाटक, सिनेमा, मालिका अशा प्रत्येक माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनायाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. विशेष म्हणजे वयाच्या 80 व्या वर्षीही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. अष्टपैलू रंगकर्मी दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा काही तरी नवीन करायला जात आहेत. 

दिलीप प्रभावळकर पहिल्यांदा इंटरनॅशनल आदित्य बिर्ला सेंटर परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादरीकरण करणार आहेत. त्यांच्या बहुचर्चित पत्रापत्री या अभिवाचनाचा प्रयोग ९ नोव्हेंबर रोजी ऑपेरा हाऊसमध्ये होणार आहे. आतापर्यंत देश- परदेशातील अनेक थिएटरमध्ये सादरीकरण केलेल्या प्रभावळकरांनी याआधी कधीही ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये सादरीकरण केले नव्हते. त्यामुळे या प्रयोगासाठी ते स्वतः फार उत्सुक आहेत.

आगामी प्रयोगाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "पत्रापत्रीचे आतापर्यंत २५ प्रयोग झाले आणि येत्या ९ नोव्हेंबरला ऑपेरा हाऊसला प्रयोग आहे. ऑपेराच्या प्रयोगासाठी मी फार उत्सुक आहे. कारण मी यापूर्वी कधीच तिथे प्रयोग केले नाही. त्या वास्तुला एक ऐतिहासिक महत्त्व तर आहेच शिवाय एक परंपराही आहे. त्यामुळेच त्या दिवसाचा प्रयोग मला खूप समाधान देऊन जाईल हे निश्चित आहे. रंगभूमीवरील एका वेगळ्या प्रकारासाठी आणि वेगळ्या अनुभवासाठी सर्वांनी पत्रापत्री पाहायला हवं हे मी आवर्जुन सांगेन".

पुढे प्रभावळकर म्हणाले की, "वाचन संस्कृतीला स्वतःचं असं महत्त्व आहे. पत्रातून व्यक्त होताना विचारांची देवाण- घेवाण तर होतेच, शिवाय एक अंतरीचा संवादही होतो. हा अनुभव जर कोणाला घ्यायचा असेल तर पत्रापत्री पाहावं लागेल. विशेष म्हणजे पत्रापत्रीमध्ये अभिवाचन केली जाणारी पत्रं ही प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीची आहेत. वर्तमानकाळातही तेव्हा लिहिलेली पत्रं चपखल बसतात ही या पत्रापत्रीची जमेची बाजू आहे".

बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित पत्रापत्रीमध्ये एकूण पाच पत्रांचे अभिवाचन आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. यात तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा असून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करतात. आतापर्यंत १०० हून अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या विजय केंकरे यांच्यासाठी पत्रापत्री खास आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, प्रभावळकरांच्या पत्रापत्री पुस्तकाला साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला. सोलापुरात झालेल्या कार्यक्रमावेळी केंकरेही तिथे उपस्थित होते. तेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून त्यांनी पत्रापत्री पुस्तक वाचलं आणि यावर एक रंजक अभिवाचनाचा प्रयोग होऊ शकतो हे त्यांच्या डोक्यात आलं.

पत्रापत्रीच्या लेखनाबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, "मी जेव्हा माधवराव आणि तात्यासाहेब यांची पत्रं लिहीत होतो. तेव्हा मी माधवराव आणि तात्यासाहेब होऊन लिहित होतो. त्यामुळे त्यात लेखक आणि नट दोघंहr डोकावतात. ही पत्रापत्रीची जमेची बाजू आहे. मला नेहमी वाटतं की संगीताचा जसा कान असतो तशीच विनोद किंवा व्यंग टिपण्याची एक दृष्टी असते. याचा वापर मी या अभिवाचन दृक आविष्कारामध्ये पाहायला मिळतं".

पत्रापत्री निमित्ताने दिग्दर्शक विजय केंकरेंसोबत काम करण्याबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, "यापूर्वी मी विजयसोबत सई परांजपे यांच्या नांदा सौख्यभरे नाटकाचे अमेरिकेतील प्रयोग केले होते आणि जयंत दळवी यांच्या नाती गोती नाटकात आम्ही काम केलं होतं. याशिवाय विजयच्या दिग्दर्शनाखाली मी आतापर्यंत सातवेळा काम केलं आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांच्या कामाची पद्धत अगदी पूर्णपणे माहीत आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून माझी शक्तीस्थानं काय आहेत आणि माझ्या मर्यादा काय आहेत हे त्याला पूर्णपणे माहीत आहे. तसंच विजयला एका व्यक्तिरेखेतून नक्की काय हवंय हे मला पटकन कळतं. त्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस फारच रंजक होती".

Web Title: Marathi Dilip Prabhavalkar Will Performe Play Patra Patri In Royal Opera House Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.