महेश मांजरेकरांच्या दोन्ही लेकी झळकणार एकाच चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 12:33 PM2022-01-30T12:33:39+5:302022-01-30T12:34:25+5:30
Mahesh Manjrekar: अलिकडेच झालेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी गौरीसह त्यांची दुसरी लेक सई हिच्या अभिनय कारकिर्दीविषयीदेखील भावना व्यक्त केल्या. तसंच गौरी आणि सई या दोघींना एकत्र घेऊन एका चित्रपटात काम करायला आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे महेश मांजरेकर (mahesh manjarekar). फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, कोकणस्थ,शिक्षणाचा आयला घो अशा असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांचं दिग्दर्शक केल्यानंतर पांघरुण हा त्यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांची लेक गौरी इंगवले हिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या चित्रपटाविषयी आणि खासकरुन त्यांच्या लेकीविषयी त्यांची मत मांडली आहेत.
अलिकडेच झालेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी गौरीसह त्यांची दुसरी लेक सई हिच्या अभिनय कारकिर्दीविषयीदेखील भावना व्यक्त केल्या. तसंच गौरी आणि सई या दोघींना एकत्र घेऊन एका चित्रपटात काम करायला आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली.
"सईला लॉन्च करायला मला आवडलं असतं पण तिला 'दबंगमध्ये काम करायची संधी मिळाली. पण, माझं स्वप्न केव्हा पूर्ण होईल, ज्यावेळी मी एक सुंदर रोल घेऊन तिला एखादा चित्रपट करेन. त्यावेळी मला जास्त अभिमान वाटेल. म्हणजे आताही मला तिचा अभिमान आहेच पण एक रुखरुख आहे की मला तिच्यासोबत काम करायचंय", असं महेश मांजरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "जर का मला एखादी संधी किंवा गोष्ट मिळाली की ज्यात मला सई आणि गौरी या दोघींसोबत काम करायला मिळालं तर अधिकच छानच होईल."
दरम्यान, महेश मांजरेकरांनी दोन्ही लेकींना एकत्र घेऊन काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सई आणि गौरी यांना एकत्र पडद्यावर केव्हा पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.