Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड
By शर्वरी जोशी | Published: February 18, 2022 05:52 PM2022-02-18T17:52:08+5:302022-02-18T17:57:12+5:30
Nagraj Manjule: कलाविश्वात अनेक लोकप्रिय तरुण कलाकार असतानादेखील ते सर्व सामान्यांपैकी एखाद्या व्यक्तीची चित्रपटात लीड रोलसाठी कशी काय निवड करतात? हा प्रश्न अनेकांना पडतो.
नागराज मंजुळे हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. 'नाळ', 'पिस्तुल्या' आणि सुपरहिट ठरलेला 'सैराट' या चित्रपटांमुळे नागराज मंजुळे हे नाव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजलं. त्यांच्या सैराटची तर बॉलिवूडलाही भुरळ पडली. त्यामुळेच या चित्रपटावर आधारित 'धडक' हा चित्रपट आला. विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रिय होणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांसोबतच काही नॉन ग्लॅमरस चेहरेदेखील झळकले. त्यामुळे कलाविश्वात अनेक लोकप्रिय तरुण कलाकार असतानादेखील ते सर्व सामान्यांपैकी एखाद्या व्यक्तीची चित्रपटात लीड रोलसाठी कशी काय निवड करतात हा प्रश्न अनेकांना पडतो. प्रेक्षकांच्या याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
नागराज मंजुळे यांचा 'झुंड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या ते या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. विशेष म्हणजे सैराट, फ्रँडी या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या झुंड' या चित्रपटातही असेच काही नवे आणि नॉन ग्लॅमरस चेहरे झळकले आहेत. त्यामुळेच या कलाकारांना ते कसं शोधतात किंवा त्यांचीच निवड का करतात याचा खुलासा त्यांनी केला आहे.
"मी लहान असल्यापासून मला सतत वाटायचं की चित्रपटात आपल्याला कसं काम करता येईल. मलाही वाटायचं की कलाविश्वात काही तरी करावं. पण, त्यावेळी ते शक्य नव्हतं. आणि, आता मी त्या क्षेत्रात काहीतरी करतोय, तर माझ्यासारखी इच्छा बाळगणाऱ्यांना संधी द्यावी असं वाटतं. तसंच, आपण सौंदर्याची एक व्याख्या केली आहे की असा चेहरा म्हणजे सुंदर. ही व्याख्या आपण मुलींसोबत मुलांबरोबरही केली आहे. पण आपण एक माणूस म्हणून त्या सगळ्याच्या पलिकडे आहोत", असं नागराज मंजुळे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "तसंच गोष्टीदेखील अशा मांडल्या पाहिजेत ज्या आजवर कधीही कोणी सांगितल्या नसतील. आणि मुळात चेहरे म्हणून ती लोकं सुद्धा सगळ्यांसमोर आली पाहिजेत. इतकंच नाही तर आपल्या आजुबाजूला इतरं टॅलेंट विखुरलेलं आहे की त्यांनाही नक्कीच संधी मिळाली पाहिजे. तसंच माझं जे पात्र असतं त्याच्या जवळ जाणारीच व्यक्ती मी शोधतो. त्याचा पात्राला शोभणारी भाषा, त्याचं दिसणं, त्यांचा आवाज हे सगळं मी पाहतो."
दरम्यान, नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत सैराट, फ्रँडी यांसारख्या चित्रपटातून आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात अशा कितीतरी नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांना कलाविश्वाशी ओळख करुन दिली आहे. विशेष म्हणजे हे कलाकार आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. तसंच सैराटनंतर आता नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षीत ठरलेला झुंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.