पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार... 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकांनी केली कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 02:52 PM2018-04-13T14:52:20+5:302018-04-13T14:54:42+5:30
मराठी सिनेमा आता त्याच्या चांगल्या कन्टेन्टमुळे आणि दर्जेदारपणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तर आपली दखल घ्यायला भाग पाडतच आहे. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही सतत आपला मराठी झेंडा फडकवत आहे.
मराठी सिनेमा आता त्याच्या चांगल्या कन्टेन्टमुळे आणि दर्जेदारपणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तर आपली दखल घ्यायला भाग पाडतच आहे. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही सतत आपला मराठी झेंडा फडकवत आहे. गेली काही वर्ष सतत मराठी सिनेमांना सर्वोत्कृष्ट सिनेमांचे राष्ट्रीय पुरस्कार, अभिनेत्यांना, दिग्दर्शकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. यात एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक नवीन मराठी दिग्दर्शकांना त्यांच्या पहिल्याच मराठी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या दिग्दर्शकांच्या यादीत अनेक नावे आहेत. इतकंच काय तर दरवर्षी या यादीत नावांची भर पडत आहे. मराठीत आता नव्याने अनेक नवीन तरूण दिग्दर्शक सिनेमा तयार करत आहेत. आपल्या नव्या दृष्टीकोनातून सिनेमाला नवं वलय मिळवून देत आहे. आणि प्रेक्षकांच्याही ते पसंत पडत आहे. याशिवाय त्यांच्या पहिल्या कलाकॄतींना राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय. चला जाणून घेऊया अशा काही मराठी दिग्दर्शकांबद्दल ज्यांना त्यांच्या पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
* प्रसाद ओक
अभिनेता प्रसाद ओक हा अभिनेता म्हणून किती चांगला आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्या सोबतच तो एक चांगला दिग्दर्शकही आहे याचा अनुभव त्याने दिग्दर्शित केलेल्या 'कच्चा लिंबू' या सिनेमातून बघायला मिळाले. प्रसादचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा 65 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्याने याआधी 'हाय काय नाय काय' या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्यासोबत मिळून केले होते. पण कच्चा लिंबू हा त्यांनी एकट्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे त्याला या यादीत स्थान देणे योग्य ठरतं.
* राजेश मापुस्कर
६४व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही मराठी सिनेमाने झेंडा फडकावला. गेल्यावर्षी ‘व्हेंटिलेटर’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. तसे त्यांनी याआधी ‘फरारी की सवारी’ या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. पण मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी पहिल्यांदाच केलं असल्याने या यादीत त्यांचं नाव येतं. ‘व्हेंटिलेटर’साठी राजेश मापुस्करांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार तर मिळाला यासोबतच सर्वोत्कृष्ट संकलन आणि साऊंड मिक्सिंगसाठीही पुरस्कार मिळाला आहे.
* रवी जाधव
मराठी सिने इंडस्ट्रीतील स्टार दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘नटरंग’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा. उत्तम कथा, पटकथा आणि तितक्याच दर्जेदार संगीताने या सिनेमाचे रूपच पालटून टाकले. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आजही या सिनेमाचा चाहता वर्ग आहे. यानंतर रवी जाधव यांनी ‘बालगंधर्व’, ‘बीपी’, ‘टीपी’ ‘टीपी२’ या सिनेमांचेही दिग्दर्शन केले आहे. २०१० साली या सिनेमाला मराठीतील सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
* सुजय डहाके
सुजय डहाकेने या तरूण दिग्दर्शकाने ‘शाळा’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा. या सिनेमाने मराठी इंडस्ट्रीला एक वेगळीच वाट मिळाली. याच सिनेमातून अनेक नवीन कलाकार इंडस्ट्रीला मिळाले. या सिनेमाने भरघोस यश मिळवलं. आजही हा सिनेमा आवडीने बघितला जातो. २०११ सालचा राष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला मिळाला होता. मराठीतील सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार या सिनेमाला मिळाला आहे.
* नागराज मंजुळे:
नागराज मंजुळे या प्रतिभावंत दिग्दर्शकाचा ‘फॅन्ड्री’ हा पहिलाच सिनेमा. याआधी नागराजच्या ‘पिस्तुल्या’ या शॉर्टफिल्मला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण एक फिचर फिल्म म्हणून ‘फॅन्ड्री’ हा नागराजचा पहिलाच सिनेमा. समाजातील एक भयान वास्तव या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये सुद्धा हा सिनेमा खूप गाजला. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनीही या सिनेमाला जोरदार प्रतिसाद दिला. २०१३ सालचा सर्वोत्कॄष्ट दिग्दर्शक(डेब्यूट) चा राष्ट्रीय पुरस्कार नागराजला तर याच सिनेमातील कलाकार सोमनाथ अवघडे याला सर्वोत्कॄष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित 'पावसाचा निबंध' या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कार जिंकला. विशेष म्हणजे, नागराजचा हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
* महेश लिमये:
अनेक गाजलेल्या आणि मोठ्या बॅनरच्या हिंदी सिनेमांना सिनेमटोग्राफर म्हणून काम केलेल्या महेश लिमये यांचा दिग्दर्शक म्हणून ‘यलो’ हा पहिलाच सिनेमा. ‘फॅशन’, ‘पेज थ्री’, ‘दबंग’ अशा अनेक हिंदी सिनेमांसाठी महेशने सिनेमटोग्राफी केली आहे. त्यानंतर त्याने पहिल्यांदाच दिग्दर्शनात हात आजमावला. आणि त्यात त्याला यशही मिळालं. २०१४ मध्ये या सिनेमाला ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. स्पेशल ज्युरी अवॉर्ड आणि स्पेशल मेन्शन अॅवॉर्ड गौरी गाडगीळ आणि संजना राय यांना देण्यात आला आहे.
* चैतन्य ताम्हाणे:
चैतन्य ताम्हाणे या तरूण दिग्दर्शकाचा दिग्दर्शक म्हणून ‘कोर्ट’ हा पहिलाच सिनेमा आहे. चैतन्यने शॉर्ट फिल्म केल्या आहेत. शिवाय त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजल्याही आहेत. ‘कोर्ट’ सिनेमानेही अनेकांची पसंती मिळवली आहे. या सिनेमाला २०१५ चा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
* अविनाश अरूण
अविनाश अरूण या प्रतिभावंत दिग्दर्शक-सिनेमटोग्राफरने ‘किल्ला’चे दिग्दर्शक केले आहे. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल्समध्ये चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर सिनेमाला २०१५ सालचा सर्वोत्कॄष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. अविनाश अरूण या तरूण दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. शिवाय सध्या चर्चा सुरू असलेल्या ‘मसान’ या हिंदी सिनेमाची सिनेमटोग्राफी सुद्धा अविनाश अरूण ह्यानेच केली आहे.
* परेश मोकाशी
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा पहिलाच सिनेमा. याआधी त्यांनी रंगभूमीवर खूप काम केले आहे. पण एक दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा. या सिनेमाला २००८ सालचा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.
* रत्नाकर मतकरी
रत्नाकर मतकरी हे साहित्य क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. त्यांनी पहिल्यांदाच ‘इन्व्हेस्टमेंट’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाला २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.
* संदीप सावंत
संदीप सावंत यांनी ‘श्वास’ या गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमाने ऑस्करमध्ये एन्ट्री मिळवली होती. या सिनेमाला २००४ सालचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि अश्विन चितळे या बाल कलाकाराला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.