झिम्मा: स्त्री मनाचा वेध घेणारं 'माझे गाव…' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 02:30 PM2021-11-02T14:30:00+5:302021-11-02T14:30:00+5:30
Maze Gaon: प्रत्येक स्त्रीच्या मनात वेगवेगळे विचार घोळत असतात. स्वच्छंदी राहणं, मुक्तपणे हवा तिथे संचार करणं, वावरणं अशी सुप्त भावना तिच्या मनात कायम असते.
मराठी कलाविश्वात आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. वेगवेगळे विषय, कथानक, नवी धाटणी,विचारशैली असे असंख्य मुद्दे निर्माते, दिग्दर्शकांनी हाताळले आहेत. समाजात घडणाऱ्या घटनांपासून ते ऐतिहासिक, पौराणिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांनंतर आता स्त्री मनाचा वेध घेणारा 'झिम्मा ' (Jhimma )हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. हे गीत प्रेक्षकांना विशेष भावलं. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
प्रत्येक स्त्रीच्या मनात वेगवेगळे विचार घोळत असतात. स्वच्छंदी राहणं, मुक्तपणे हवा तिथे संचार करणं, वावरणं अशी सुप्त भावना तिच्या मनात कायम असते. परंतु, कौटुंबिक जबाबदारी पेलत असताना तिच्या भावना मनातल्या मनात कुठेतरी बाजूला पडतात. हे सारे भाव माझं गाव या नव्या गाण्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
''कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव'' या सुंदर गाण्याला अपेक्षा दांडेकरचा स्वरसाज लाभला असून अमितराजने त्याला संगीत दिलं आहे. हे गाणं ऐकल्यावर प्रत्येक व्यक्ती आपोआप अंतर्मुख होतो. मन अतिशय शांत होते. विचारांचा वेग मंदावतो आणि ओठांवर मंद हास्य उमटते.
दरम्यान, वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि एकमेकींना पूर्णपणे अनोळखी असलेल्या स्त्रिया मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
झिम्मामध्ये कलाकारांची मांदियाळी
'झिम्मा' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.