मराठी रिअ‍ॅलिटी शो, अंबानी इव्हेंट ते भन्साळींचा 'हीरामंडी'; मराठमोळ्या नृत्यांगणेचा थक्क करणारा प्रवास

By तेजल गावडे | Published: October 6, 2024 05:38 PM2024-10-06T17:38:05+5:302024-10-06T17:39:56+5:30

Pooja Shede : नृत्यांगणा आणि अभिनेत्री पूजा शेडे मराठी आणि हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे. तिने मराठी रिअ‍ॅलिटी शो आणि मालिकेत छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडी, हीरामंडीमध्येही तिने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले आहे. तसेच आलिया भट आणि रणवीर सिंगचा सिनेमा रॉकी और रानी की प्रेम कहानीमधील धिंडोरा बाजे रे या गाण्यातही ती झळकलीय. नवरात्रीनिमित्त जाणून घेऊयात तिचा प्रवास आणि तिच्या आयुष्यातील दुर्गांबद्दल...

Marathi reality show, Ambani event to Sanjay Leela Bhansali's 'Heeramandi'; The astonishing journey of a Marathi dancer Pooja Shede | मराठी रिअ‍ॅलिटी शो, अंबानी इव्हेंट ते भन्साळींचा 'हीरामंडी'; मराठमोळ्या नृत्यांगणेचा थक्क करणारा प्रवास

मराठी रिअ‍ॅलिटी शो, अंबानी इव्हेंट ते भन्साळींचा 'हीरामंडी'; मराठमोळ्या नृत्यांगणेचा थक्क करणारा प्रवास

नृत्यांगणा आणि अभिनेत्री पूजा शेडे (Pooja Shede) मराठी आणि हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे. तिने मराठी रिअ‍ॅलिटी शो आणि मालिकेत छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय संजय लीला भन्साळींच्या 'गंगूबाई काठियावाडी', 'हीरामंडी'मध्येही तिने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले आहे. तसेच आलिया भट आणि रणवीर सिंगचा सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील 'धिंडोरा बाजे रे' या गाण्यातही ती झळकलीय. नवरात्रीनिमित्त जाणून घेऊयात तिचा प्रवास आणि तिच्या आयुष्यातील दुर्गांबद्दल...  

तू डान्सिंग क्षेत्रात कशी आलीस? 
मला बालपणापासूनच डान्सची आवड होती. खरंतर माझ्या आईबाबांना डान्सची आवड आहे. मी बालवाडीत असताना पुण्याला संस्कारवर्ग घेण्यासाठी अपर्णा ताई यायच्या. त्या कथ्थक शिकवायच्या. हे माझ्या आईला कळल्यावर मला त्यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवण्यासाठी पाठवले तिथून माझ्या कथ्थकच्या प्रवासाला सुरूवात झाली. त्यामुळे या क्षेत्रातील त्या माझ्या पहिल्या गुरू आहेत. आठवी-नववी इयत्तेत माझे डान्समध्ये बीए आणि एमए करायचे ठरले होते. त्यासाठी अपर्णा ताईंनी मला मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की, अकरावी, बारावी आर्ट्समधून कर नंतर ललित केंद्रातून बीए आणि एमए कर. मग मी मनिषा साठे यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्या माझ्या गुरू आहेत. त्यांच्याकडे मी बीए, एमए आणि नृत्य अलंकारचे धडे गिरविले. 

सिनेइंडस्ट्रीकडे कशी वळलीस?
ऑगस्ट, २०१७ साली माझा खऱ्या अर्थाने या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. मुघल-ए-आजम नावाचे एक प्रॉडक्शन आले होते. हे पहिले प्रोडक्शन होते जे  म्युझिक, ड्रामा आणि डान्स हे सगळे लाइव्ह परफॉर्म करायचे. त्याला म्युझिकल म्हणायचे. म्युझिकल ही साधारण परदेशातील कॉन्सेप्ट आहे. ती भारतात पहिल्यांदा आणली फिरोज अब्बास खान यांनी. त्याचे ऑडिशन होते आणि मी दिले. त्यात माझी निवड झाली. कमर्शियल इंडस्ट्रीकडे वळण्याची ही माझी पहिली पायरी होती. याचे शोज भारतात आणि परदेशात होणार होते. मी जो सीझन केला त्याचा पहिला शो दिल्लीत झाला. तेव्हा पहिल्यांदा मी घरापासून दूर दिल्लीला ४० दिवसांसाठी गेले होते. मुघल-ए-आझम हा शो केल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे मी मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. त्याच्याआधी मुघल-ए-आझमच्या निमित्ताने मी दिल्ली-मुंबई असे चार दौरे झाले होते. मार्च, २०१८ साली मी मुंबईत स्थायिक झाले आणि तेव्हाही मी मुघल-ए-आझम शो करत होते. इथे आल्यावर माझ्या ओळखी वाढल्या. मग ऑडिशन द्यायला सुरूवात केली. 

हिंदी सिनेमात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी कशी मिळाली?
२०२० मध्ये माझ्या करिअरला कलाटणी मिळेल अशी मोठी संधी मला मिळाली. ज्यात मी लोकांना दिसले. ते होतं 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील गाणं 'शिकायत'. हे गाणं हुमा कुरेशीवर चित्रीत झालं आहे. एक दिवस रात्री मला फोन आला की, उद्या फ्री आहेस का? एक शूट आहे, त्यासाठी रिहर्सल आहे. तो फोन कोरियोग्राफर कृती महेशच्या असिस्टंटचा होता. या क्षेत्रात कोणाला घ्यायचे हे साधारण कोऑर्डिनेटर ठरवतो. शेवटचा निर्णय हा कोरियोग्राफरचा असतो. मी ज्या क्षणाची वाट पाहत होते ती संधी मला मिळाली, त्यासाठी स्वतःला मी खूप नशीबवान समजते. मला कृती महेश यांच्यासोबत काम करायचे होते. त्यामुळे कोणताही क्षणाचा विलंब न करता काम करण्यासाठी होकार दिला.



 
'महाराष्ट्राची लावण्यवती'च्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांग.
शिकायत गाणं करत असताना मला आणखी एक संधी मिळाली. या गाण्याचे शूटिंग सुरू असताना माझ्या घरून फोन आला की, महाराष्ट्राची लावण्यवती ब्युटी पेजेंट शोचं ऑडिशन सुरू आहे. तर तुला द्यायचा असेल तर दे. तो ऑडिशनच्या प्रवेश प्रकियेचा शेवटचा दिवस होता. मी दिवस संपण्याआधी रात्री १२ वाजता ऑडिशन पाठवले. मग दोन दिवसांनी मला निवड झाल्याचा फोन आला. मी फिल्मसिटीमध्ये गाण्याचे रात्री शूटिंग करत होते आणि शोचं ऑडिशन मिरा रोडला होतं. संध्याकाळी ६ ते रात्री ६ पर्यंत शूट असायचे. मग मी ऑडिशनला सकाळी ९ वाजता गेले. त्यांना मी १२ वाजता फ्री करायला सांगितले होते. त्यांनी मला ४ वाजता फ्री केले. तिथून थेट मी गंगूबाई काठियावाडीच्या सेटवर गेले. तिथे थोडा पॉवर नॅप घेतली. त्या दिवशी मी ३६ तास झोपले नव्हते. पण मला ते करायला मजा येत होती. त्या ऑडिशनमधून माझी टॉप १२मध्ये निवड झाली आणि या शोची मी दुसरी उपविजेती ठरली. 

डान्सनंतर तू अभिनयाकडे कशी वळलीस?
महाराष्ट्राची लावण्यवती या शोमुळे मला लोक ओळखू लागले आणि आणखी कामं मिळाली. मी दोन मराठी मालिकेत छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या. मला अभिनय करायलाही मजा आली. त्यामुळे माझा अभिनयाकडेही थोडा कल वाढला. त्यामुळे अ‍ॅक्टिंगसाठी मी ऑडिशन देत असते. डान्सची छोटी मोठी काम चालू असतात. 


बॉलिवूडमधील तुझ्या कामाबद्दल सांग?
अनुपम खेर यांचा नवा सिनेमा येतो आहे. त्यातही मी एका गाण्यात डान्स केला आहे. 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमात हुमा कुरेशीवर चित्रीत झालेल्या शिकायत गाण्यात मी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले. याशिवाय मी 'हिरामंडी'मध्ये काम केले. यातील दोन गाण्यात परफॉर्मर म्हणून काम केले आणि एका गाण्यासाठी कृती महेशची असिस्टंट म्हणून काम केलं. 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' 'धिंडोरा बाजे रे..' गाण्यात काम केले आहे. वैभवी मर्चंटसोबत खूप काम केले. त्यांच्यामुळे मला खूप कामेदेखील मिळाली आहेत. अंबानींसारख्या लोकांसोबत काम करायला मिळाले. नुकताच पार पडलेल्या आयफा २०२४मध्ये मी बऱ्याच गाण्यांवर कलाकारांसोबत डान्स केला आहे.

बॉलिवूडमध्ये डान्सर म्हणून तुझा अनुभव कसा होता?
संजय लीला भन्साळींच्या सेटवर खूप शिकायला मिळते. त्यांचे सगळीकडे खूप बारकाईने लक्ष देतात. सगळीकडे काम करतानाचा अनुभव खूप वेगळा असतो. बऱ्याचदा सेटवर डान्सरकडे लोकांना पाहण्याचा दृष्टीकोण खूप वेगळा असतो. त्यांना फार महत्त्व दिले जात नाही. पण अनुपम सरांच्या सेटवर काम करताना त्यांनी आम्हाला डान्सर असं संबोधले नाही. त्यांनी आम्हाला खूप आदर दिला. सेटवर बोमण ईराणी यांनी आमच्या सर्वांसाठी बिर्याणी बनवून आणली होती आणि सर्वांना खाल्ली का, कशी वाटली असे विचारले. जॅकी श्रॉफ सर किती फ्रेंडली आहेत, हे तुम्हाला माहितच आहे. एवढेच नाही तर अनुपम सरांनी भारतातील शूट संपलं त्या दिवशी त्यांनी सर्वांना त्यांची ओळख सांगून मेडल दिले. हे पाहून मला खूप छान वाटले. 


इंडस्ट्रीत तुला कधी वाईट अनुभव आला आहे का?
मला कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे. याबद्दल थेट विचारले जाते. पण मी स्पष्ट नकार देते. आपल्याला या गोष्टीला सामोरे जाता आले पाहिजे. खरेतर हे चुकीचे आहे. असे व्हायला नाही पाहिजे. याशिवाय फॉलोव्हर्स आणि इंस्टाग्राम आयडीवरून कलाकारांची निवड केली जाते आणि ओळखीवरून काम दिले जातं, या गोष्टीची मला खूप खंत वाटते. ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांना दुर्लक्षित केले जाते. मग कुठेतरी ज्यांच्याकडे खरेच टॅलेंट आहे आणि त्यांची संधी हिरावून घेतली जाते, हे पाहून कुठेतरी वाईट वाटते.

तुझ्या आयुष्यातील दुर्गा कोण आहेत?
माझी सर्वात मोठी दुर्गा माझी आई आहे. कारण मला या क्षेत्रात येण्यासाठी माझ्या आईवडिलांचा खूुप मोठा पाठिंबा मिळाला आहे. मी कधी कधी कोलमडून जाते तेव्हा आई माझी समजूत काढते आणि प्रोत्साहन देते. त्यामुळे माझ्या आयुष्यातील ती आधारस्तंभ आहे. त्यानंतर माझ्या पहिल्या गुरू अपर्णा ताई, नंतर मनिषा ताई आणि इंडस्ट्रीत बरेच गुरू आहेत. त्या सगळ्यांची मी आभारी आहे.


या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांना काय मार्गदर्शन करशील?
कलाविश्वात संयम खूप गरजेचा आहे. त्यामुळे विचारपूर्वक या क्षेत्रात या. मी सहा वर्ष झाली मुंबईत आहे. मला जे हवे आहे, त्यासाठी माझा संघर्ष अजून सुरू आहे. त्यामुळे संयम ठेवून या. डान्स क्षेत्रात करिअर करायचे आहे. तर कोणत्याही शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घ्या. कारण हे खूप महत्त्वाचे आहे. छान मनापासून काम करा. काम करत राहा काम मिळत राहिल.

Web Title: Marathi reality show, Ambani event to Sanjay Leela Bhansali's 'Heeramandi'; The astonishing journey of a Marathi dancer Pooja Shede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.