‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार? वाचा, वाहिनीने काय केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:32 AM2022-04-07T10:32:42+5:302022-04-07T10:37:17+5:30
Mulgi Zhali Ho : छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि लागोलाग या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते किरण माने यांची पोस्टही चर्चेत आली.
छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zhali Ho) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि लागोलाग या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते किरण माने यांची पोस्टही चर्चेत आली. किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. किरण माने यांनी पुर्वसूचना न देता ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप केला होता. शिवाय राजकीय भूमिका घेतल्यामुळेच किरण माने यांना मालिकेतून काढल्याची चर्चा होती.
यानंतर बराच वाद रंगला होता. त्यानंतर काही सहकलाकारांनी किरण माने यांच्यावर गैरवर्तन करत असल्याचे आरोप केले होते. या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजताच किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहित मत मांडलं होतं. आता मात्र स्टार प्रवाहने (Star Pravah) या एकूणच एपिसोडवर स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे, ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार नसल्याचंही वाहिनीने स्पष्ट केलं आहे.
बंद होणार नाही तर वेळ बदलणार...!!
स्टार प्रवाहवर ‘मुलगी झाली हो’ मालिका ज्या वेळेला प्रसारित होते, त्या वेळेत ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. नवी मालिका सुरु होणार असल्यानं ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण मालिका बंद होणार नसल्याचं स्टार प्रवाहने स्पष्ट केलं आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार नसून नव्या वेळेत दाखवली जाणार आहे. केवळ मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता दुपारी 2 वाजता भेटीला येईल, असं स्टार प्रवाह वाहिनीनं सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
किरण माने यांची पोस्ट
मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी लांबलचक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. ‘प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो... मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्रॉडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली !!! जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बयाचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाना-या स्पेशल प्राईम टाईम ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’...’असं किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं..