पुन्हा सुरू होतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; 'या' तारखेपासून हास्यमहारथी येतायत प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 11:16 AM2024-11-02T11:16:43+5:302024-11-02T11:23:10+5:30
आता कॉमेडीची हॅटट्रीक होणार, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Maharashtrachi hasyajatra : सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेने अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सचिन गोस्वामी-सचिन मोटे यांची निर्मिती-दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो अनेकांच्या घरात आवडीने बघितला जातो. गेल्या काही महिन्यांपासून हा शो बंद होता. परंतू आता हास्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम सुरू होणार आहे. खळखळून हसवायला हास्यजत्रेतील अतरंगी कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे कलाकार या अमेरिका टूरवर असल्यामुळे हा शो काही काळ तरी बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षक निराश झाले होते. पण, आता या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही कलाकार या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहेत.
समीर चौघुले, प्रियदर्शीनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर तसेच ओंकार राऊत यांसारखे कलाकार या प्रोमोमध्ये दिसत आहेत. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सगळ्यांना सांगताना दिसत आहे.
सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना त्यांनी म्हटलं की, “रसिकहो, क्या है हॅटट्रीक..? या कॉमेडीच्या हॅटट्रीकचा निखळ आनंद घेण्यासाठी नक्की पाहूया, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ - कॉमेडीची हॅटट्रिक!” २ डिसेंबरपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.