सोशल मीडियावर ‘बापल्योक’चा बोलबाला; ट्रेलर अन् गाणं होतंय ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:53 PM2023-08-14T17:53:49+5:302023-08-14T17:54:18+5:30
Baaplyok:वडील आणि मुलाचं नातं उलगडून सांगणारा बापल्योक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बाप लेकाचं नातं कधीच नीट दिसत नाही कारण ते नातं कायम अबोल असतं. आज अनेक चित्रपटांची निर्मिती होते परंतु, बाप-लेकाचं नातं सांगणारे सिनेमा फार कमी आहेत. म्हणूनच, वडील आणि मुलाचं नातं उलगडून सांगणारा बापल्योक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पुर्वी त्याचा प्रदर्शित झालेला ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत.
बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा या चित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने वन मिलियन व्ह्यूज टप्पा गाठला आहे. ट्रेलर आणि चित्रपटातील ' उमगाया बाप रं' हे गीत सध्या ट्रेंडिंगला आहे. नागराज मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून रिंगण, कागर, सोयरीक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
या सिनेमात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘बापल्योक’ हा सिनेमा येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचे ओझे घेऊन धावणाऱ्या बापाने अजून जोरात पळायला हवे, असे प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असत. पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो, तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात. प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही. आणि दुसऱ्याची बाजूही कळत नाही. ‘बापल्योक’च्या ट्रेलर मधून हाच प्रवास अधोरेखित होतोय. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.