'तमाशा लाईव्ह'ची 'ब्रेकिंग न्यूज'; संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:35 PM2022-07-04T13:35:12+5:302022-07-04T13:36:42+5:30
Tamasha Live: या ट्रेलरमधून ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी पत्रकारांमध्ये कशाप्रकारे धडपड सुरु असते. या क्षेत्रात कशाप्रकारे स्ट्रगल, जबाबदारी, एकमेकांविषयी इर्षा असते हे मुद्दे आधोरेखित करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live ) या एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव असे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा अन्य चित्रपटांपासून काहीशी वेगळी असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. यामध्येच प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील काही गाणी प्रदर्शित झाली होती. या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक प्रकारे जणू जादूच केली. त्यामुळे या चित्रपटामध्ये नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. यामध्येच आता चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी पत्रकारांमध्ये कशाप्रकारे धडपड सुरु असते. या क्षेत्रात कशाप्रकारे स्ट्रगल, जबाबदारी, एकमेकांविषयी इर्षा असते हे मुद्दे आधोरेखित करण्यात आले आहेत.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात 'ब्रेकिंग न्यूज'साठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा यात अधोरेखित होत आहे. आता यातून आणखी काही 'ब्रेकिंग न्यूज' आपल्या समोर येणार का, हे 'तमाशा लाईव्ह' पाहिल्यावरच कळेल. यात सिद्धार्थ आणि हेमांगीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारी गाणी कथा पुढे नेणारी आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार असल्याचे दिसतेय.
दरम्यान, या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांचं असून निर्मिती एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर यांची आहे. हा चित्रपट येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.