'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, दिसणार हटके भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:47 PM2022-05-25T15:47:13+5:302022-05-25T15:47:46+5:30
Mazya Navryachi Bayko: 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीनं मराठी सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव (Ruchira Jadhav). 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayko) या मालिकेत माया ही भूमिका साकारून रुचिरा घराघरात पोहचली आहे. ही मालिका संपून आता बराच काळ लोटला आहे. मात्र, तिची लोकप्रियता कायम आहे. रुचिराच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. अभिनेत्री रुचिरा जाधवने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती सुदर्शन गमरे यांच्या ‘हेमोलिम्फ’ (Haemolymph) या चित्रपटात झळकणार आहे.
हेमोलिम्फ ही अब्दुल वाहिद शेख या शिक्षकाची खरी कथा आहे, ज्यांच्यावर ११ जुलै २००६ रोजी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटानंतर गंभीर कलमे लावण्यात आली होती. या आरोपांनी वाहिदसह त्याचे कुटुंबीयही खवळले होते. वाहिदचा न्यायासाठीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अब्दुल वाहिद शेखची पत्नी साजिदा शेख ची भूमिका अभिनेत्री रुचिराने साकारली आहे. तिच्यासाठी ही भूमिका खूप चॅलेजिंग होती. कारण या चित्रपटात तिचा चेहरा चित्रपटात दाखवला नसल्याने रुचिराला तिच्या भावना तिच्या डोळ्या, देहबोली आणि आवाजातून व्यक्त कराव्या लागल्या.
याबद्दल रुचिरा म्हणाली की, "जेव्हा दिग्दर्शक सुदर्शन माझ्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन आले होते. तेव्हा मी या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक झाले होते. मला कथा आणि माझी व्यक्तिरेखा खूप आवडली, संपूर्ण स्क्रिप्ट मला सांगितल्यानंतर, ते मला म्हणाले चित्रपटात तुमचा चेहरा दिसणार नाही. तुम्हाला तुमच्या डोळ्यातून आणि देहबोलीतून अभिनय करावा लागेल आणि तुम्ही व्यक्त करत असलेल्या भावना प्रेक्षकांना पटवून द्याव्या लागतील. मी हे एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि चित्रपटाची मागणी असल्याने मी संपूर्ण चित्रपटात माझा चेहरा दाखवला नाही.”
हेमोलिम्फ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुदर्शन गमरे यांनी केले आहे. हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.