Video: CID पाहून कोरियन नागरिक शिकला अस्खलित हिंदी; आज आहे फेमस युट्यूबर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 01:04 PM2022-01-26T13:04:02+5:302022-01-26T13:06:14+5:30
सध्या सोशल मीडियावर जुन हाक ली या कोरिनय युट्यूबरची चर्चा रंगली आहे. जुन हाक ली हा दक्षिण कोरियाचा नागरिक असून तो हिंदी भाषा शिकत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा प्रेक्षकवर्ग कोणत्याही ठराविक भाषेपुरता मर्यादित राहिला नसून तो वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट, वेबसीरिज पाहू लागला आहे. यामध्येच सध्या कोरियन ड्रामा वा वेबसीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या प्रेक्षकवर्गाप्रमाणेच असेही काही कोरियन नागरिक आहेत ज्यांचा खासकरुन बॉलिवूड वा हिंदी चित्रपट, मालिका पाहण्याकडे कल वाढत आहे. यामध्येच एका कोरिअन नागरिकाने चक्क CID पाहून हिंदी भाषा शिकल्याचं समोर आलं आहे.
सध्या सोशल मीडियावर जुन हाक ली या कोरिनय युट्यूबरची चर्चा रंगली आहे. जुन हाक ली हा दक्षिण कोरियाचा नागरिक असून तो हिंदी भाषा शिकत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या प्रवासात CID आणि आमीर खानच्या '3 इडियट्स' या चित्रपटाचा मोठा वाटा आहे. ली ने त्याच्या युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे.
ली १५ वर्षांचा असताना त्याच्या शाळेत शिक्षकांनी त्यांना '3 इडियट्स' हा चित्रपट दाखवला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर ली हिंदी भाषेकडे आकर्षित झाला आणि त्याने हिंदी शिकण्याचा निर्धार केला.प्रथम दोन महिने ली ने काही पुस्तकांच्या मदतीने हिंदी भाषा शिकली. त्याच्या मतानुसार, हिंदी आणि कोरिया भाषेत बरंच साम्य आहे. या दोघांमधील व्याकरणही बऱ्यापैकी सेम आहे.
CID पाहायला सुरुवात केली
हिंदी शिकण्यासाठी ली ने भारतात येण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यावर त्याने काही भारतीय नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. युपी, बिहार मधील लोकांसोबत वेळ घालवला तसंच काही टीव्ही मालिकाही पाहू लागला. यात त्याने CID आवर्जुन पाहिले. विशेष म्हणजे CID च्या एसीपी प्रद्यूममुळे माझं हिंदी अजून चांगलं झालं असं ली ने सांगितलं.
दरम्यान, ली ने त्याचं एक युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. 'कोरिया का लाला' असं त्याच्या युट्यूब चॅनेलचं नाव असून २ लाखांपेक्षा जास्त त्याचे फॉलोअर्स आहेत. या चॅनेवर तो त्याचे हिंदी भाषेतील व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या देशाचीही हिंदीत माहिती देत असतो. हिंदीसोबतच ली बंगाली भाषाही बोलतो.