विख्यात शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा स्मृतिदिन

By Admin | Published: September 27, 2016 09:55 AM2016-09-27T09:55:26+5:302016-09-27T09:58:25+5:30

विख्यात शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा आज (२७ सप्टेंबर)स्मृतिदिन

Memorial Day of renowned classical singer Shobha Gurtu | विख्यात शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा स्मृतिदिन

विख्यात शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा स्मृतिदिन

googlenewsNext
- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २७ - विख्यात शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा आज (२७ सप्टेंबर)स्मृतिदिन. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते.
 
पूर्वायुष्य
शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. ८ फेब्रुवारी १९२५ साली कर्नाटक राज्यात बेळगाव येथे त्यांचा जन्म झाला. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर घराण्याच्या उस्तादअल्लादिया खान यांचेकडून घेतले होते.
 
शोभाताईंचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण त्या लहान असतानाच उस्ताद भुर्जी खान यांचेकडे सुरू झाले. ते उस्ताद अल्लादिया खानांचे धाकटे सुपुत्र होत. शोभाताईंची ग्रहणशक्ती व प्रतिभा यांमुळे भुर्जी खानांच्या कुटुंबाने ह्या मुलीस आपल्या परिवाराचा जणू हिस्साच बनविले. नंतर त्या उस्ताद नथ्थन खानांकडे संगीत शिकू लागल्या. उस्ताद घम्मन खान हे शोभाताईंच्या आईला, मेनकाबाईंना त्यांच्या मुंबई येथील घरी ठुमरी - दादरा व इतर उपशास्त्रीय संगीताचे प्रकार शिकवायला यायचे. त्यांच्याकडेही शोभाताई संगीत शिकल्या.
 
सांगीतिक कारकीर्द
ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती इत्यादी उपशास्त्रीय संगीत प्रकार हे शोभाताईंची खासियत होते. आपल्या गायनात शास्त्रीय संगीतातील आलापी त्या खुबीने वापरत असत. गायिका बेगम अख्तर व उस्ताद बडे गुलाम अली खानयांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. शोभाताईंच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते. त्यांनीमराठी व हिंदी भाषा चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी सर्वप्रथम ज्या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले तो म्हणजे कमाल अमरोहींचा पाकिजा (१९७२) होय. फागुन (१९७३) मध्ये त्यांनी 'बेदर्दी बन गए कोइ जाओ मनाओ सैंयां' हे गीत गायले. मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) साठी त्यांनी गायलेल्या 'सैंया रूठ गए' गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट पार्श्वगायिकेचे नामांकन मिळाले होते. 'सामना' व 'लाल माती' ह्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. गझल, मराठी नाट्य संगीत या गायन प्रकारांतही त्यांनी श्रोत्यांची दाद मिळविली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.
 
आपल्या कारकीर्दीत शोभाताईंनी संगीत कार्यक्रमांसाठी देशोदेशी दौरे केले. आपला मुलगा त्रिलोक गुर्टू यांच्या जाझ संगीताच्या ध्वनिमुद्रिकांसाठीही त्या गायल्या आहेत. इ.स. २००० मध्ये भारताच्या गणराज्याला पन्नास वर्षे झाल्याप्रीत्यर्थ भारतातील मान्यवर गायक व संगीतज्ञांच्या गटाने एकत्रितपणे गायलेले 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत गाण्याचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला. हे राष्ट्रगीत त्यानंतर वर्षभर दूरदर्शनवर रोज प्रसारित होत असे.
 
वैयक्तिक आयुष्य
शोभाताईंचा विवाह विश्वनाथ गुर्टू यांच्याशी झाला होता. त्यांचे सासरे 'पंडित नारायण नाथ गुर्टू' हे बेळगावातील उच्चपदस्थ पोलिस ऑफिसर, विद्वान व सतार वादक होते. शोभाताईंच्या नरेंद्र व त्रिलोक ह्या दोन मुलांपैकी त्रिलोक हे वाद्यमेळकार (पर्कशनिस्ट) आहेत.
 
पाच तपांपेक्षाही अधिक काळ ठुमरी विश्वाचे सम्राज्ञीपद भूषविलेल्या शोभाताईंचे २७ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजीमुंबई येथे निधन झाले.
 
पुरस्कार व सन्मान
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८७. 
पद्मभूषण पुरस्कार, इ.स. २००२
लता मंगेशकर पुरस्कार
शाहू महाराज पुरस्कार
महाराष्ट्र गौरव पुरस्कार
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

 

Web Title: Memorial Day of renowned classical singer Shobha Gurtu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.