मी मराठी संगीताचा ‘दिवाना’!!-संगीतकार विशाल ददलानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 07:15 PM2018-11-30T19:15:02+5:302018-11-30T19:16:39+5:30
बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे संगीतकार विशाल ददलानी. आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या एकेक गाण्यांवर तरूणाई फिदा असते. शांत तसेच उडत्या चालीच्या गाण्यांना संगीत देण्याची त्यांची ख्याती.
तेहसीन खान
बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे संगीतकार विशाल ददलानी. आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या एकेक गाण्यांवर तरूणाई फिदा असते. शांत तसेच उडत्या चालीच्या गाण्यांना संगीत देण्याची त्यांची ख्याती. त्यांनी आगामी मराठी चित्रपट ‘विठ्ठल’ यांतील ‘विठ्ठला विठ्ठला’ हे गाणं गायलं आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही दिलखुलास चर्चा...
* विशाल, हे गाणं तुझ्यासाठी स्पेशल दिसतंय, काय सांगशील?
- मी एक मुंबईकर असून मला हे गाणं गायला मिळालं, याचा मला प्रचंड आनंद आहे. मी आणि शेखर आम्ही दोघांनी मिळून ‘बालक पालक’ नावाचा चित्रपट केला होता. त्यातील ‘कल्ला’ हे गाणं मी गायलं होतं. त्यानंतर मी ‘जिंदगी विराट’ चित्रपटातील ‘मल्हार’ हे गाणं गायलं होते, त्या गाण्याला प्रेक्षकांचे प्रचंड पे्रम मिळाले. विशेष म्हणजे मी जेव्हा मुंबईच्या बाहेर जातो तेव्हा मला चाहत्यांचे प्रेम मिळते. ‘विठ्ठला विठ्ठला’ हे गाणंही माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आणि जवळचं आहे.
* या गाण्याचे विशेष काय आहे?
- या गाण्याचे संगीत दिग्दर्शक राजू सरदार यांच्यासोबत मी पूर्वी पण काम केले आहे. त्यांच्यासोबत मी लाइव्ह म्युजिक कॉन्सर्टमध्येही काम केले आहे. तसेच गाण्याचे चित्रीकरणही उत्तम झाले आहे. श्रेयस तळपदे यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे खूपच सुंदर आहे. आत्तापर्यंत गणपतीसाठी गाणी गायली आहेत पण, प्रथमच विठ्ठलासाठी गाणे गायले आहे.
* सध्या मराठी चित्रपटसृष्टी चर्चेत आहे. पण, तुला मराठी चित्रपटसृष्टींच्या संगीताबद्दल काय सांगावसं वाटतं?
- संगीतदिग्दर्शक अजय-अतुल यांनी सर्वप्रथम मराठी संगीताचा वेगळा प्रवाह सुरू केला. ते दोघेही माझे चांगले मित्र आहेत. अशातच आम्ही ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’च्या दोन गाण्यांवर आम्ही काम केलं. त्याशिवाय ‘ब्रदर्स’ चित्रपटांतही आम्ही एकत्र काम केलं. मला असं वाटतं की, अजय-अतुल म्हणजे महाराष्ट्राचे ए.आर.रहमान आहेत, मला ते प्रचंड आवडतात.
* तुझं आवडीचं गाणं कोणतं?
- मला मराठी गाणे सगळेच आवडतात. पण, सैराटचे गाणे मला प्रचंड आवडले. ‘नटरंग’ पासून अजय-अतुलने जे संगीत दिले आहे, मी त्यांचा फॅन झालो आहे.
* तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी काय सांगशील?
- संगीतकाराचे आयुष्य हे कायम संगीताशी निगडित असते. प्रत्येक छोटया छोटया गोष्टीतलं संगीत हे अभिप्रेत असते. प्रत्येक दिवस संगीतापासून सुरू होतो आणि संगीतपर्यंत संपतो. संगीत बनवत असताना असे वाटत नाही की मी काम करतोय असे वाटते की, मी मजा करतोय. प्रत्येक दिवस सेलिब्रेशन असते.