#MeToo : सुभाष घईंच्या विरोधात केलेली तक्रार केट शर्माने घेतली मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 01:18 PM2018-11-24T13:18:09+5:302018-11-24T13:25:23+5:30
अभिनेत्री केट शर्माने सुभाष घई यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिने त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती. पण आता ही तक्रार केटने मागे घेतली आहे.
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या झालेल्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत खुलेपणाने बोलत आहेत. आपल्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, गायक, संगीतकार यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेले आहेत. आलोक नाथ, सुभाष घई, अन्नू मलिक, कैलाश खेर, साजिद खान यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले असून यामुळे काहींना त्यांचे आगामी प्रोजेक्ट देखील गमवावे लागले आहेत.
अभिनेत्री केट शर्माने सुभाष घई यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. तिने त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती. तिने केसमध्ये म्हटले होते की, घई यांनी ६ ऑगस्ट रोजी मला भेटण्यासाठी त्यांच्या घरी बोलवले होते. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांच्याव्यतिरिक्त आणखी पाच ते सहा लोक उपस्थित होते. सुभाष घई यांच्याविरोधात तिने काहीच दिवसांपूर्वी तक्रार नोंदवली होती. पण आता ही तक्रार केटने मागे घेतली असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटले आहे.
केट शर्माने टाइम्सची बोलताना सांगितले आहे की, मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यापासून मला वारंवार पोलिस ठाण्यात जावे लागत होते. सतत होणाऱ्या चौकशीला मी कंटाळले होते. या सगळ्याचा मानसिक त्रास माझ्यासोबत माझ्या कुटुंबाला देखील होत होता. अनेकजण मीटू या मोहिमेद्वारे आपल्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडत आहेत. काही जण हिंमत करून तक्रार देखील दाखल करत आहेत. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाहीये. त्यामुळेच मी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
केटने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी एका महिलेने देखील सुभाष घई यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सुभाष घई यांनी घरी सोडण्याचा निमित्ताने माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या महिलेने म्हटले होते. या महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते.