#MeToo : पार्टी सुरु झाली आणि त्याने फ्लर्ट सुरू केले...! अभिनेता पियुष मिश्रावरही आरोप!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 09:16 PM2018-10-11T21:16:28+5:302018-10-11T21:54:18+5:30
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक छळ, गैरवर्तनाच्या आरोपात आणखी एका अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. हा अभिनेता म्हणजे पियुष मिश्रा.
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक छळ, गैरवर्तनाच्या आरोपात आणखी एका अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. हा अभिनेता म्हणजे पियुष मिश्रा. अभिनेत्यासोबत लेखक, संगीतकार अशीही पियुष मिश्राची ओळख आहे. केतकी जोशी नामक महिलेने फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित पियुष मिश्रावर गंभीर आरोप केले आहेत. पियुष मिश्राने माझा हात जोरात पकडला आणि आपल्या हाताने कुरवाळू लागला, असे तिने लिहिले आहे. ही घटना २०१४ ची असल्याचे तिने सांगितले आहे.
२०१४ मध्ये मित्रांची पार्टी होती. या पार्टीत पियुष मिश्राही होता. पार्टी रंगात आली असताना पियुष मिश्राने मला पाहिले आणि जवळ बोलावले. त्याने माझे नाव, मी काय करते, असे सगळे विचारले. चर्चा सुरू असताना आणि आजुबाजूला २०-२५ लोक असताना त्याने हळूहळू माझ्यासोबत फ्लर्ट करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे पाहून एक गाणेही म्हटले. पियुष मिश्रा दारूच्या नशेत होता. पार्टी संपताच सगळे निरोप घेऊ लागलेत. मी माझ्या एका मैत्रिणीसोबत आले होते. मी तिची वाट पाहू लागले. पियुष मिश्रा तेव्हा खुर्चीत बसला होता. मी त्याच्या जवळून गेले तेव्हा अचानक त्याने माझा हात पकडला आणि माझ्याशी छेडछाड सुरू केली. मी पार्टी होस्टकडे पाहून इशारा केला. पार्टी होस्टने मला जोरात हाक मारून बोलावले. मी जाऊ लागले तेव्हा त्याने पुन्हा माझा हात पकडला. मी तो सोडवून पुन्हा जाऊ लागले तेव्हा पियुष मिश्रा उठून उभा झाला आणि आता मला मिठी मारू लागला. हे पाहून मी त्याच्यावर जोरात ओरडल़. माझा आवाज ऐकून तिथे काही लोक आले आणि त्यांनी पियुष मिश्राला तिथून बाजूला केले. मी आज हा किस्सा सांगतेय कारण, त्याने अन्य काही महिलांसोबत असे केले असेल तर त्यांना बोलण्याची हिंमत मिळावी, असे मला वाटते. याबदल्यात माझ्याविरोधात पियुष मिश्राने कायदेशीर कारवाई केली तरी मला पर्वा नाही, असेही या महिलेने म्हटले आहे.
दरम्यान पियुष मिश्राने यावर बोलण्यास नकार दिला आहे. कहाणी आकर्षक आहे. पण मी सध्या मीडियाशी यावर बोलू इच्छित नाही. मला आठवतही नाही. असे काही झाले असेल तर माफी, असे त्याने म्हटले आहे़, असे त्याने म्हटले आहे.