#MeToo अन्नू मलिक प्रकरणाबाबत गायक अलिशा चिनॉयने केले धक्कादायक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:47 PM2018-10-22T13:47:09+5:302018-10-22T13:48:39+5:30
आता गायिका अलिशा चिनॉयने अन्नू मलिकविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अन्नू मलिकवर करण्यात आलेले सगळे आरोप खरे असून त्याच्या या स्वभावाबाबत बॉलिवूडमधील अनेक मंडळींना माहीत असल्याचे अलिशाने म्हटले आहे.
बॉलिवूडमध्ये आलेले मीटूचे वादळ काही केल्या शमायचे नाव घेत नाही आहे. मीटू मोहिमेअंतर्गत रोज एक नवा खुलासा होताना दिसतो आहे. गायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितनंतर आणखीन दोन महिलांनी संगीतकार-गायक अन्नू मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. मिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या महिलांनी सांगितले की, 90 च्या दशकात मेहबूब स्टुडिओमध्ये एका गाण्याचे शूटिंग सुरु होते. ज्यावेळी या महिला त्याला भेटायला गेल्या होत्या त्यावेळी अन्नूने त्यांना चुकिच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर एकदा यापैकी एका महिलेला त्याने काही कामानिमित्त घरी बोलावले होते. आधी काही काळ औपचारिक गप्पा मारल्यानंतर त्याने माझा स्कर्ट वर केला. त्याला ढकलून मी दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं पण या प्रसंगाबाबत कोणाला काहीच न सांगण्याची धमकी त्याने मला दिली होती. नंतर मला घरी सोडताना त्याने पुन्हा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,’ असं त्या महिलेचा आरोप आहे. तर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक आहे.
हे सगळे प्रकरण सुरू असताना आता गायिका अलिशा चिनॉयने अन्नू मलिकविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अन्नू मलिकवर करण्यात आलेले सगळे आरोप खरे असून त्याच्या या स्वभावाबाबत बॉलिवूडमधील अनेक मंडळींना माहीत असल्याचे अलिशाने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर नव्वदच्या दशकात अलिशाने अन्नू मलिकने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप लावला होता. या आरोपानंतर अन्नूने तिच्यावर 2 कोटीचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. या घटनेनंतर अलिशा आणि अन्नू यांनी कधीही एकत्र काम न करण्याचे ठरवले होते. पण 2002 साली इश्क विश्क या चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघांनी एकत्र काम केले. तसेच इंडियन आयडल या कार्यक्रमात देखील ते दोघे परीक्षक म्हणून झळकले होते.
अन्नू मलिक याच्यावर जे आरोप महिलांनी केले आहेत ते अतिशय योग्य आहेत. या महिलांना माझा पाठिंबा आहे. अन्नू हा सैतान असून त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तींना देखील सोडलेले नाही. अन्नू मलिकच्या या स्वभावाविषयी गुलजार, साजिद नाडियाडवाला, साजिद खान यांना देखील माहीत असल्याचे अलिशाने सांगितले आहे.
अन्नूवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या परीक्षकपदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे.