"सामान घेण्यासाठी शेवटचं सेटवर गेलो अन्...", समृद्धी बंगला पाडताना पाहून मिलिंद गवळी भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 03:05 PM2024-11-24T15:05:48+5:302024-11-24T15:06:31+5:30

समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन घेऊन आलो, मिलिंद गवळीं म्हणाले...

Milind gawali shared emotional post when he saw aai kuthe kay karte serial set to dismantle | "सामान घेण्यासाठी शेवटचं सेटवर गेलो अन्...", समृद्धी बंगला पाडताना पाहून मिलिंद गवळी भावुक

"सामान घेण्यासाठी शेवटचं सेटवर गेलो अन्...", समृद्धी बंगला पाडताना पाहून मिलिंद गवळी भावुक

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका निरोप घेत आहे. मालिकेने तब्बल पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अनिरुद्धच्या भूमिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांना खूप प्रेम मिळालं. मालिकेतील सर्वच कलाकार आपापली भूमिका अक्षरश: जगले. त्यामुळे मालिकेच्या सेटला अखेरचा निरोप देताना सगळेच भावुक झाले होते. काल सेटवरुन राहिलेलं सामान घेण्यासाठी मिलिंद गवळी (Milind Gawali) गेले असता समृद्धी बंगला तोडत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ते भावुक झाले. आपल्या भावना त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये उतरवल्या आहेत. 

'आई कुठे काय करते' मालिकेतला समृद्धी बंगला खराखुरा बंगला वाटावा असाच त्याचा सेट होता. विशेष म्हणजे याच बंगल्याला कधी कोर्टरुम, कधी आश्रम, कधी हॉस्पिटल असेही रुप देण्यात आले होते. याचीच आठवण सांगत मिलिंद गवळी लिहितात, "१९ नोव्हेंबर ला २०२४ 'आई कुठे काय करते'चं  रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं. २० तारखेला मतदान आणि २१ तारखेला 'आता होऊ दे धिंगाणा 3'चं 'आई कुठे काय करते' च्या सहकलाकारांबरोबर शूटिंग होतं. म्हणून मग २२ तारखेला, म्हणजेच काल माझ्या मेकअप रूममध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यामध्ये गेलो. बंगल्याचा सेटिंगचा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं. मला आमचा समृद्धी बंगला आधी ओळखूच नाही आला. हीच का ती वास्तु जिथे आम्ही पाच वर्ष स्वतःचं घर समजून  बिनधास्त वावरत होतो. गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू , प्रोजेक्टर गुंडाळून ट्रक मध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे. तसंच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक."

"आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजनशाही सर, आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता. अगदी पाच वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं. त्यातली माणसं खरी खरी वाटत होती. आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली. एका क्षणात ते घर नव्हतं तर एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं. यालाच जीवन ऐसे नाव म्हटलं जातं बहुतेक. आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपतीच्या मुर्त्या बनवल्या जातात. रोज तिची आराधना पूजा केली जाते आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकांचं होत असावं.


खरंतर हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, this is an imaginary world, illusionary world, एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं एक कथा येते. त्या कुटुंबाला शोभणारं घर, आर्ट डायरेक्टर तयार करतो. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो. स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरूम, कोणाला विश्वास बसणार नाही पण या समृद्धी बंगल्यामध्ये 40 लोकेशन तयार केली गेली होती. अक्षरशः कोर्ट रूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसेस, आश्रम, हॉस्पिटल्स, 90% शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं. फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो, ते पण दोन चार किलोमीटरच्या परिसरात, तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डी के पी च्या अनुपमाच्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण dismantle केलं, पण मी मात्र त्यातलं तुळशीचे रोप माझ्यासाठी राखून ठेवलं. ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणाला नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय."

Web Title: Milind gawali shared emotional post when he saw aai kuthe kay karte serial set to dismantle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.