मिठ्ठास विनोदाची गोड साखरपेरणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 03:20 AM2017-04-09T03:20:54+5:302017-04-09T03:20:54+5:30

साखरेच्या वेष्टनातून कडू गोळीचा डोस दिला की, तो गळ्याखाली सहज उतरतो, हे सत्य आहे, तसेच नाटकात प्रशांत दामले यांच्यासारखा हरहुन्नरी आणि मिठ्ठास नट असला, तर अशा

Miththas humorous sweet sugar maker ..! | मिठ्ठास विनोदाची गोड साखरपेरणी..!

मिठ्ठास विनोदाची गोड साखरपेरणी..!

googlenewsNext

- राज चिंचणकर

नाटक - ‘साखर खाल्लेला माणूस’

साखरेच्या वेष्टनातून कडू गोळीचा डोस दिला की, तो गळ्याखाली सहज उतरतो, हे सत्य आहे, तसेच नाटकात प्रशांत दामले यांच्यासारखा हरहुन्नरी आणि मिठ्ठास नट असला, तर अशा साखरेच्या वेष्टनाची गरजही उरत नाही, हेसुद्धा तितकेच खरे आहे. किंबहुना, त्यातली औषधाची गोळीसुद्धा त्या गोडव्यात विरघळून जाण्यातच धन्यता मानते. असाच काहीसा अनुभव ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक देते. या नाटकाचा विषय चक्क मधुमेहाशी संबंधित असूनही, प्रशांत दामले यांनी या नाटकाच्या टीमसह यात केलेल्या साखरपेरणीने या नाटकाच्या गोडव्यात भरच पडली आहे.
एका विमा कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेले विलास देशपांडे या सद्गृहस्थांना मधुमेहाचे निदान होते आणि त्यांची पत्नी माधवी विलासवर पथ्यपाण्याचे निर्बंध लादते. आॅफिसची टार्गेट्स आणि आता मधुमेह याने विलासराव पार चिडचिडे होऊन जातात. अशातच त्यांची मुलगी ऋचा हिचे बाहेर काहीतरी प्रकरण असल्याचा सुगावा यांना लागतो आणि त्याचा परिणाम त्यांचा चिडचिडेपणा वाढण्यावर होतो. ऋचाशी या विषयावर बोलल्यावर ती त्यांचे म्हणणे थेट हसण्यावारी नेते. या गोंधळात मधुमेहतज्ज्ञ असलेला ओंकार हा ऋचाचा मित्र व प्रियकर, विलासरावांची ‘तब्येत’ आजमावण्यासाठी त्यांच्या घरी येतो आणि त्यांना एकावर एक उपदेशाचे धडे देत सुटतो. या प्रकाराने विलासराव अधिकच हैराण होतात. या सगळ्यात माधवी तर विलासरावांच्या हात धुऊन मागे लागते. हा सर्व गोंधळ घालत आणि तो निस्तरत हे नाटक गोड अशा वळणावर जाऊन पोहोचते.
लेखक विद्यासागर अध्यापक यांनी या नाटकातून मधुमेहासारखा गंभीर विषय हाताळला असला, तरी त्याचे लेखन करताना त्यांची लेखणी गोडव्यात भिजून निघाली आहे. साहजिकच, चुरचुरीत संवाद आणि खुसखुशीतपणा याने ही संहिता परिपूर्ण झाली आहे. त्यामुळे ‘ब्लॅक कॉमेडी’च्या परिघात फिरणारे हे नाटक अनुभवताना निव्वळ धमाल येते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आतापर्यंत हाताळलेल्या विविध नाटकांच्या फॉर्मपेक्षा वेगळे नाटक या निमित्ताने केले आहे आणि या फॉर्मवरही त्यांची किती हुकूमत आहे, त्याचे स्वच्छ प्रतिबिंब यात पडलेले प्रकर्षाने जाणवते. संहितेतील विनोदाचा मुक्त वापर लक्षात घेत आणि त्याला आवश्यक तो लगाम घालत त्यांनी हे नाटक मंचित केले आहे. नाटकातल्या पात्रांना त्यांनी बऱ्यापैकी मोकळे सोडले असले, तरी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे त्यांनी ठेवलेला अंकुशही स्पष्ट जाणवतो.
उत्कृष्ट टायमिंग, भन्नाट एनर्जी यासह उत्तम वाचिक आणि कायिक अभिनयाचे प्रतिबिंब, यात विलास देशपांडेंची भूमिका रंगवणाऱ्या प्रशांत दामले यांच्या रूपाने नाटकात पडले आहे. चपखल संवादफेक आणि देहबोलीचा अचूक वापर करत, त्यांनी वाक्यावाक्याला हंशे वसूल केले आहेत. शुभांगी गोखले (माधवी) यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा लक्षवेधी ठरेल असे पात्र या नाटकात उभे केले आहे आणि तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा भाग आहे. प्रशांत दामले आणि त्यांचे ट्युनिंगही मस्त जमले आहे. ऋचा आपटे (ऋचा) हिने आजच्या युगाच्या बेधडक तरुणाईचे प्रतिनिधित्व यात केले आहे, तर संकर्षण कऱ्हाडे (ओंकार) याने संयत आणि सालसपणे यातला डॉक्टर रंगवला आहे.
अशोक पत्की यांचे कानांत रुंजी घालणारे संगीत व प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य यांनी नाटकाच्या देखणेपणात भर घातली आहे. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन, अष्टविनायक आणि एकदंत या तीन संस्थांनी मिळून रंगभूमीवर आणलेले हे नाटक मनोरंजनाचा हमखास बार उडवून देणारे आहे. हे नाटक पाहून डोक्याला असलेल्या रोजच्या टेन्शनचा विसरच पडेल, याची तजवीजसुद्धा या नाटकाने करून ठेवली आहे.

Web Title: Miththas humorous sweet sugar maker ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.