“एवढे भुंगे भुणभुण करतायत म्हणजेच उत्तरसभा चांगलीच झोंबलीये”; मनसेचा जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:21 IST2022-04-13T14:19:43+5:302022-04-13T14:21:16+5:30
Amey khopkar: गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते.

“एवढे भुंगे भुणभुण करतायत म्हणजेच उत्तरसभा चांगलीच झोंबलीये”; मनसेचा जोरदार टोला
राज ठाकरे यांच्या सभेनंतर राजकीय वातावरण तापलेले असताना आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. "पण या भुंग्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आम्हाला. कारण ते नुसतेच आवाज करणारे भुंगे आहेत. आमचा फोकस आहे तो म्हणजे राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा… एवढे भुंगे भुणभुण करतायत म्हणजेच उत्तरसभा चांगलीच झोंबलेली आहे", असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. या काळातच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. ज्यात अमेय खोपकर यांनी राऊतांना टोला लगावला होता.
''मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितली होती. मात्र, ईडीने तर राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली'', असा टोला त्यांनी लगावला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांवरुन चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या ३ तारखेपर्यंत हे लाउडस्पीकर न हटवल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.