चिन्मयच्या 'गालिब'चा गौरव, पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावनिक प्रतिक्रिया, म्हणाला…
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:26 PM2024-04-25T13:26:46+5:302024-04-25T13:28:03+5:30
प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिलला सोहळा पार पडला.
अभिनेता-लेखक चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरून ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे चिन्मयचा मुलगा हा सध्या 11 वर्षांचा आहे. चिन्मयने या ट्रोलिंगला संतापून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. आता या ट्रोलिग प्रकरणांमध्येच चिन्मयचा गौरव झाला आहे.
दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात चिन्मय मांडलेकरला त्याच्या 'गालिब' नाटकासाठी गौरविण्यात आलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी पार पडला आहे. दीनानाथ नाट्यग्रह येथे हा सोहळा झाला. या सोहळ्याला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, मंगेशकर कुटुंबीय, चिन्मय मांडलेकर असे बरेच मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर चिन्मय मांडलेकरनं उपस्थित मान्यवरांसमोर भावनिक भाषण केलं.
चिन्मय म्हणाला, 'सर्व मान्यवारांना नमस्कार.. सभागृहात कर्तुत्वाने खूप मोठी असलेली माणसं आहेत. त्यांना सर्वांना प्रणाम. नाटकाला पुरस्कार मिळणं ही खूप गोष्ट आहे. यामध्ये संपूर्ण टीमची मेहनत आहे. आमच्या निर्मात्यांचे मी आभार मानतो. फक्त एकच गोष्ट बोलेन, भारतात जन्माला आलेल्या लहान मुलाच्या डीएनएमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात. एक असतं मंगेशकर, दुसरं असतं बच्चन आणि तिसरं नाव कारण मी महाराष्ट्रातून आहे ते म्हणजे सराफ.
पुढे तो म्हणाला, 'जेव्हापासून कळायला लागलं, तेव्हा पहिला चित्रपट हा नमक हलाल पाहिला होता. अशी ही बनवाबनवी तर कमीत कमी १०० वेळा आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. इथूनच प्रेरणा घेऊन आज इथंपर्यंतचा प्रवास झाला आहे. जेव्हा कोणी विचारतं तू या क्षेत्रात का आला आहेस? तेव्हा या उत्तरात डीएनएमध्ये असलेली ही तीन नावं कारणीभूत आहेत. मंगेशकर, बच्चन आणि सराफ'. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.