‘मल्टिप्लेक्स’कडून अजूनही मराठीला दुय्यम वागणूक

By Admin | Published: August 30, 2015 03:16 AM2015-08-30T03:16:50+5:302015-08-30T03:16:50+5:30

‘विहीर’, ‘वळू’, ‘देऊळ’, ‘मसाला’ असा कथा-पटकथा आणि अभिनेता म्हणून सुरू झालेला गिरीश कुलकर्णी यांचा प्रवास आज ‘हायवे-एक सेल्फी आरपार’ या चित्रपटापर्यंत येऊन पोहोचला आहे.

'Multiplex' still subordinated to Marathi | ‘मल्टिप्लेक्स’कडून अजूनही मराठीला दुय्यम वागणूक

‘मल्टिप्लेक्स’कडून अजूनही मराठीला दुय्यम वागणूक

googlenewsNext

‘विहीर’, ‘वळू’, ‘देऊळ’, ‘मसाला’ असा कथा-पटकथा आणि अभिनेता म्हणून सुरू झालेला गिरीश कुलकर्णी यांचा प्रवास आज ‘हायवे-एक सेल्फी आरपार’ या चित्रपटापर्यंत येऊन पोहोचला आहे. पूर्वी चित्रपटांकडे एक मनोरंजनाच्या माध्यमातून पाहिले जात होते. चित्रपट कसा पाहावा, तो पाहताना कोणता दृष्टिकोन असावा... अशी एक नजर गिरीश आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी प्रेक्षकांना दिली. त्यांच्या आशयघन चित्रपटांमुळे काही प्रमाणात एक ‘क्लासी’ प्रेक्षक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यांचे सर्व चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरले असले, तरी आजही मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ मिळत नाही, अजूनही मराठी चित्रपटांना पक्षपाती वागणूक दिली जाते, याबद्दलची खंत गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मराठी चित्रपटाचे मार्केट तयार करण्यात आपण कमी पडतोय, असेही ते म्हणतात. मल्टिप्लेक्स ओनर्सना जास्तीत जास्त लोक येतील, हे नक्कीच हवे असते. त्यांच्यासाठी नफा महत्त्वाचा असतो. हिंदी चित्रपटांकडून त्यांना भरपूर अपेक्षा असतात. त्यामुळे मराठीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणूनच ते मराठीला दुय्यम स्थान देतात; पण त्या चित्रपटाचे महत्त्व कळल्यावर मग ते शोज वाढवितात. तुम्ही आम्हाला संधी तर द्या, असे मी मल्टिप्लेक्स चालकांना सांगू इच्छितो. मान्य आहे, कधी कधी भारंभार चित्रपट पण बनवले जातात, त्याचा फटका बसणेही स्वाभाविकच आहे. मात्र, दर्जेदार सिनेमा आले तर या चित्रपटांना तरी जागा मिळाली पाहिजे.
मल्याळम आशयघन सिनेमा तयार होतो, तेव्हा तो पैसाही कमवतो. तो चित्रपट घराघरात पोहोचेल याची दखल घेतली जाते. मुळात सगळ्या माध्यमांमध्ये काय प्रयोग चालले आहेत. त्याचे रिफ्लेक्शन तुम्ही पाहू शकता. जेव्हा आम्ही ‘मसाला’ चित्रपट केला, तेव्हा विदर्भ-मराठवाड्यात बस काढली. तिथल्या लोकांचे म्हणणे आहे, आम्हाला सिनेमा पाहण्याची इच्छा आहे, पण कुठं जाऊन पाहू ते सांगा. तिथे जाऊन कुटुंबांनी काय पण एकट्याने जाऊन सिनेमा पाहणेदेखील योग्य नाही अशी अवस्था आहे. आज शहरांची आर्थिक स्थिती बदलत आहे, कुणी तरी मल्टिप्लेक्स उभारतंय म्हणून ते चित्रपट पाहिले जात आहेत. शासनाने तालुकास्तरावर इन्फ्रास्ट्रक्चर उभारले पाहिजे; पण ते नुसते अनुदान वाटत राहतात आणि आम्ही खूप काळजी घेतली, असे म्हणतात... याला आम्ही पण काही अंशी जबाबदार आहोत, पण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न व्हायला पाहिजेत.
शब्दांकन : नम्रता फडणीस

मराठी चित्रपटांच्या आशयघनतेमुळे प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाची पायरी चढू लागले आहेत; पण आजही अशी परिस्थिती आहे, की मराठी चित्रपट हा पुण्या-मुंबईपुरताच मर्यादित राहिला आहे. चित्रपट हा संस्कृतीचा अविभाज्य भाग असला, तरी आजही त्याच्याकडे मनोरंजनाच्या माध्यमातून पाहिले जात आहे. जो शिकवला त्याच पद्धतीने आपण सिनेमा पाहत आलो आहोत. तो अजून आपल्याला कळलेलाच नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुळात चित्रपट हा आता व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे त्याचे मार्केट तयार करण्याचे काम होणे गरजेचे आहे, ज्यात अजूनही आपण कमी पडत आहोत. चित्रपट महामंडळाचे काम चित्रपटाची गोडी लावणे आहे... ग्रामीण भागात चित्रपटांचे वातावरण तयार करण्यासाठी कार्यशाळा घेणे, फिल्म फेस्टिव्हल घेणे, चित्रपटाच्या फिल्म सोसायट्या स्थापन करणे. हे काम रेग्युलरपणे करता येणे शक्य आहे. मात्र, जो आभाव आहे... तो व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या निर्मात्यांचा आहे. निर्मात्यांना सबळ करायला हवे.

Web Title: 'Multiplex' still subordinated to Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.