जेव्हा मुंबई दंगलीत आमिर खानने महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली घालवली होती रात्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 11:36 AM2018-05-24T11:36:22+5:302018-05-24T11:37:15+5:30
आमिर खान याने 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दंग्यातील त्याचा एक अनुभव सांगितलाय. यासोबतच आगामी संजू या सिनेमाबाबतही त्याने एक खुलासा केला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची एक मुलाखत सध्या सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होत आहे. या मुलाखतीत आमिर खान याने 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दंग्यातील त्याचा एक अनुभव सांगितलाय. यासोबतच आगामी संजू या सिनेमाबाबतही त्याने एक खुलासा केला.
आमिर खान आणि राजकुमार हिराणी यांची जोडी कशी आणि किती हिट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच राजकुमार हिराणी यांनी आमिर खान याला संजू सिनेमात संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांची भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती. पण आमिर खान याने ती नाकारली होती. आमिरला या सिनेमात संजय दत्तची भूमिका साकारायची होती. पण संजय दत्तच्या भूमिकेसाठी हिराणी यांनी रणबीर कपूर याला आधीच साईन केले होते.
या मुलाखतीत जेव्हा आमिरला सुनील दत्त यांच्याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, सुनील दत्त फारच चांगले माणूस होते. मला आठवतं की, मी 1993 मध्ये दंगे झाले होते तेव्हा एक ऱात्र त्यांच्यासोबत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली घालवली होती.
आमिरने सांगितले की, त्या रात्री मला सुनील दत्त यांच्याबद्दल खूपकाही जाणून घेता आहे होते. जेव्हा 1993 मध्ये मुंबईत दंगे झाले होते, तेव्हा सिने इंडस्ट्रीतील एक प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलं होतं. या मंडळाकडून मुंबईत आर्मी बोलवण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दंग्याविरोधात सुनील दत्त, यश चोप्रा, जॉनी वॉकर यांच्यासोबत मी एक रात्र महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली घालवली होती.
आमिर पुढे म्हणाला की, ती रात्र मी आजपर्यंत विसरलो नाहीये. यश चोप्रा आणि सुनील दत्त यांनी त्यांच्या जीवनाच्या अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांच्या करिअरचे अनुभव शेअर केले होते. सकाळ झाल्यावर आम्ही तेथून आपापल्या घरी परतलो.