आयटम साँग केल्यावर हवं तर गोमुत्र शिंपडून घ्या, मराठीतील संगीतकाराला देण्यात आला विचित्र सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 07:15 AM2019-10-09T07:15:00+5:302019-10-09T07:15:00+5:30

गेली चाळीस वर्षे ते एस.डी. बर्मन, शंकर जयकिशन, आर.डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांकडे वादक ते स्वतंत्र संगीतकार म्हणून कार्यरत आहेत.

Music composer ashok patki got weired suggestion | आयटम साँग केल्यावर हवं तर गोमुत्र शिंपडून घ्या, मराठीतील संगीतकाराला देण्यात आला विचित्र सल्ला

आयटम साँग केल्यावर हवं तर गोमुत्र शिंपडून घ्या, मराठीतील संगीतकाराला देण्यात आला विचित्र सल्ला

googlenewsNext

हजारो जिंगल्स आणि शेकडो नाटक-चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करणारे, वयाची अठ्ठ्याहत्तरी ओलांडलेले सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्कींना चांगल्या चालीचा संगीतकार म्हणून संगीतविश्वात ओळखले जाते. गेली चाळीस वर्षे ते एस.डी. बर्मन, शंकर जयकिशन, आर.डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांकडे वादक ते स्वतंत्र संगीतकार म्हणून कार्यरत आहेत. अशोक पत्की यांना संगीतविश्वात प्रचंड आदर आहे. पण, अलिकडेच एका सिनेदिग्दर्शकाने त्यांना “ हे आयटम साँग झाल्यावर हवेतर गोमुत्र शिंपडून घ्या, पण हे गाणं करा!”  असा विचित्र सल्ला त्यांना दिल्याने पत्कीसाहेब गोंधळून गेले.

त्याचे झाले असे की, ज्येष्ठ छायाचित्रणकार आणि सिनेदिग्दर्शक समीर आठल्ये यांनी त्यांच्या आगामी ‘बकाल’ ह्या भव्यदिव्य ॲक्शनपटासाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. पण, त्या सिनेमाचा बाज हा तरुणाईशी निगडीत असल्याने सुरुवातीला पत्कीसाहेबांनी त्याला नकार दिला. कारण, पाश्चात्य संगीतप्रकारातील ठेके आणि चित्रविचित्र आवाजांनीयुक्त संगीत निर्माण करणे त्यांच्या शैली पलिकडचे होते. तरीही समीर आठल्ये आणि पत्की यांचे चांगले ऋणानुबंध असल्याने नाही-होय करता करता पत्की साहेब संगीत देण्यास तयार झाले. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतरचनेला त्यांनी आवश्यक अशा डीजे स्टाईलला चपखल बसतील अशा चाली नेहमीप्रमाणे हार्मोनियमवर बसवल्या आणि बकाल सिनेमाच्या टीमला ऐकवल्या. पण, दिग्दर्शक समीर आठल्ये सोडून इतर टीमला चाली रुचल्या नाहीत. तसे त्या टीमने नाराज सुरात पत्की यांनी बोलुनही दाखवले. पत्की साहेबांनी सनी ह्या नव्या दमाच्या संगीत संयोजकाच्या साहाय्याने पुन्हा संगीत रचना केली. पण, टीम खुश नव्हती. पत्की साहेबही थोडे नाराज झाले आणि त्यांनी समीर ह्यांना फोन करून ”मला हे जमणार नाही. तू मला दिलेली आगाऊ रक्कम हवं तर व्याजासकट परत देतो” असे समीर आठल्ये यांना सांगितले. पण समीर आठल्ये यांनी “तुम्ही गाणी पूर्ण करा आणि नंतर ऐकवा” असा सल्ला दिला. थोड्याफार बदलांनंतर गाणी तयार झाली.   आणि ती टीमला प्रचंड आवडली.

त्यावर समीर आठल्ये ह्यांनी पत्की साहेबांवर आणखी एक बॉम्ब टाकला. तो बॉम्ब साधासुधा नव्हता तर आयटम बॉम्ब होता. “आता एक आयटम साँग करा” हे समीर आठल्ये यांचे वाक्य ऐकताच पत्की साहेब चांगलेच गोंधळले. “अरे, समीर तू माझी चौकट मोडलीस आणि हे ढाक चुक ढाक चुक संगीत करवून घेतलेस, इथवर ठीक होतं. आयटम साँग काय?  मी कधी केलंय का? आणि शब्दरचना ऐकून तर मी हे असले आयटम बियटम नंबर अजिबात करणारही नाही. मला ते जमणार नाही. वयाची अठ्ठ्याहत्तरी पार झाली रे!” पत्की साहेबांनी समीर आठल्ये ह्यांना काहीसे रागवून पण  विनंतीपूर्वक नकार दिला.. त्यावर समीर आठल्ये ह्यांनी त्यांचे काहीच न ऐकता “चौकट मोडलीच आहे तर आता पूर्णच मोडा. हे गाणे तुम्हीच करायचं, हवं तर नंतर गोमुत्र शिंपडून घ्या!” असा गमतीने सल्ला दिला. समीर आठल्येंच्या हट्टापायी अखेर अशोक पत्कींनी ‘छम छम....बर्फी संत्र्याची’ हे आयटम साँग रचले आणि ते माधुरी करमरकर, कविता राम, जान्हवी अरोरा आणि अमृता दहीवेलकर ह्या चार आघाडीच्या गायिकांकडून गाऊन घेतले. गाणे फक्कड झाल्याबरोबर पत्की साहेबांनाही मनस्वी आनंद झाला. इतकेच नव्हेतर ह्या गाण्याच्या शुटींगच्या वेळी पत्की साहेब स्वत: उपस्थित होते. आणि आयटम साँगवर थिरकणाऱ्या ‘त्या’ तीन ललनांसमवेत त्यांने छायाचित्रेही काढली.

बकाल ह्या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात हा किस्सा अशोक पत्की आणि समीर आठल्ये ह्यांनी सांगितला तेव्हा सभागृहात एकाच हशा पिकला. बकाल हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असून हा मराठीतील पहिला भव्य दिव्य ॲक्शनपट आहे. ह्या चित्रपटात अशोक पत्की यांनी स्वत:ची चाकोरी मोडून तरुणांना रुचेल अशी पाच गाणी संगीतबद्ध केली आहेत. सिद्धार्थ महादेवन, जसराज जोशी, अमेय दाते, हृषिकेश रानडे, महालक्ष्मी अय्यर, आदर्श शिंदे, धनश्री देशपांडे आदी गायकांनी स्वरसाज चढविला आहे. चित्रपटात विदर्भातील मारबत परंपरेवर आधारीत एक गाणे आहे. ते नागपूर स्थित गीतकार सुरेन्द्र मसराम आणि संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांनी रचले आहे. राजकुमार मेन्डा निर्मित शिव ओम व्हिज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत बकाल हा चित्रपट येत्या ८ नोव्हेबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 
 

Web Title: Music composer ashok patki got weired suggestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.