मराठीतील म्युझिक एक्सपेरिमेंट यशस्वी होतोय

By Admin | Published: April 15, 2016 01:49 AM2016-04-15T01:49:58+5:302016-04-15T01:49:58+5:30

‘देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी.... रखुमाई रखुमाई.... आवाज वाढव डीजे... गुलाबाची कळी... जहाँ जाऊ तुझे पाऊ...’ यासारखी अनेक सुपरहिट गाणी मराठी इंडस्ट्रीला देणारा उभरता संगीतकार

Music Experiment in Marathi is a success | मराठीतील म्युझिक एक्सपेरिमेंट यशस्वी होतोय

मराठीतील म्युझिक एक्सपेरिमेंट यशस्वी होतोय

googlenewsNext

‘देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी.... रखुमाई रखुमाई.... आवाज वाढव डीजे... गुलाबाची कळी... जहाँ जाऊ तुझे पाऊ...’ यासारखी अनेक सुपरहिट गाणी मराठी इंडस्ट्रीला देणारा उभरता संगीतकार अमित राज सध्या सुसाट सुटला आहे. एकसे बढकर एक कम्पोझिशन, दर्जेदार गाणी अन् तरुणाईला वेड लावेल अशी झिंग अमितच्या गाण्यांमध्ये असते. ओठांवर रेंगाळत राहणाऱ्या गाण्यांच्या अप्रतिम चाली अन् काळजाचा ठोका चुकविणारे शब्द, अशी सांगडच त्याच्या संगीतात दिसते. अंगावर रोमांच उभे राहतील अन् काही वेळा डोळ्यांत अश्रूदेखील तरळतील एवढी मोठी ताकद अमितच्या संगीतामध्ये आहे. अशाच गोड गळ्याच्या या संगीतकाराला मराठीमधील गाण्यांच्या बदलत्या ट्रेंडविषयी, जॉनरसंदर्भात सेलीब्रिटी रिपोर्टरच्या माध्यमातून साधलेला हा संवाद.

पूर्वीपासूनच गाण्यांमुळे चित्रपट सुपरहिट होण्याचे प्रमाण जास्त होते अन् आजही तोच ट्रेंड आहे. मराठी प्रेक्षकदेखील म्युझिकल आहेत. चित्रपटात गाणे हे पाहिजेच. गाणे ही सिनेमाची अतिशय महत्त्वाची बाजू असते, अशी मेंटॅलिटीच इंडियन आॅडियन्सची असते. आर.डी. बर्मन यांच्या काळापासूनच हिट गाण्यांमुळे पाहिले गेलेले अनेक चित्रपट आहेत. मराठी सिनेमांमध्ये वेगळे संगीत येतेय. प्रेक्षकसुद्धा क्लास-मासमध्ये अडकलेले नाहीत. नवीन गाणी आजची आॅडियन्स खासकरून तरुणाई अ‍ॅक्सेप्ट करीत आहेत. त्यामुळे मराठीमध्ये सध्या सुरू असलेला म्युझिक एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतोय, असे म्हणायला काही हरकत नाही. कोणत्याही चित्रपटाचा दिग्दर्शक हा त्या सिनेमाचा कॅप्टन असतो. त्यामुळे त्या पर्टिक्युलर सिनेमासाठी दिग्दर्शकाला कोणत्या प्रकारची गाणी अपेक्षित आहेत, त्यांचे काय मत आहे, हे जाणून घ्यावे लागते. कधी कधी अशा वेळी गाणी कम्पोझ करताना तुमच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. परंतु, सुदैवाने मला कधी तसा अनुभव आला नाही. ९० टक्के गाणी ही चालींवर तयार होतात. अगोदर चाल तयार केली जाते अन् मग त्यावर शब्द रचले जातात. बऱ्याचदा चित्रपटांसाठी दिग्दर्शकांना मेलडी साँग्जच पाहिजे असतात. दिग्दर्शकाने जर एकाच संगीतकाराकडे संपूर्ण सिनेमा दिला, तर त्याला त्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची गाणी करता येतात. जसे ‘पोश्टर गर्ल’मध्ये एकीकडे रखुमाई गाणे, तर दुसरीकडे तरुणाईला भुरळ पाडणारे आवाज वाढव डीजे आहे. अशी व्हेरिएशन्स मग आपल्याला गाण्यांमध्ये करता येतात. प्रत्येक गायकाच्या आवाजाचा एक वेगळा बाज असतो. त्याचा डिफरंट जॉनर असतो. काही ठरावीक पठडीतील गाणी त्या-त्या गायकांच्या आवाजाला सुटेबल असतात. आदर्श शिंदेला जर रोमँटिक गाणे गायला लावले तर तर तो गाईल; परंतु ते त्याच्या पद्धतीने. तसेच प्रत्येक सिंगरच्या गाण्याच्या वेळा, आवाज, जॉनर या सर्व गोष्टी ठरलेल्या असतात. आजकालच्या संगीत रिअ‍ॅलिटी शोमधून चांगले टॅलेन्ट येत असले, तरी काही वेळा त्यांचे शूटिंग शेड्यूल जाम असल्याने त्या ठरावीक वेळी गायकाचा सूर लागेलच,असे नाही. मग परीक्षकांकडून मिळालेल्या निगेटिव्ह कमेंट्समुळे तो सिंगर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. एकदा गायक तणावाखाली गेला की त्याला त्यातून बाहेर काढणे फार अवघड असते.

पहिल्या धारेचा सूर.. खुमाई
‘पोश्टर गर्ल’मधील रखुमाई-रखुमाई हे गाणे सध्या फार गाजत आहे. या गाण्यामागची कहाणी फार भन्नाट आहे. क्षितिज पटवर्धन याने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. हा सिनेमा स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारा असल्याने त्यामध्ये काही तरी वेगळे म्हणजेच रखुमाईवर गाणे असायला हवे, असे आम्हाला वाटले. आजवर विठ्ठलावर अनेक गाणी येऊन गेली; परंतु रखुमाईवर गाणे नव्हते. मग एके दिवशी मला वैभवने शब्द पाठवले ‘रखुमाई... रखुमाई’ अन् काय चमत्कार झाला! मला माहीत नाही मी जेव्हा ते गाणे वाचायला गेलो, तेव्हा डायरेक्ट ते चालीमध्येच गायले. त्यामुळे रखुमाईसाठी मला मिळालेला सूर हा पहिल्या धारेचाच होता.

रात्री २ वाजता गाणे गायले
‘७२ मैल एक प्रवास’ चित्रपटातील ‘रान भैरी’ हे गाणे घेऊन दिग्दर्शक राजीव पाटील माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, गाणे तयार आहे. तू फक्त कम्पोझ कर. काही झाले तरी लिरीक्स चेंज करायचे नाहीत. रात्री त्यांनी गाणे पाठवले अन् सांगितले, परवा शूट आहे, तेव्हा मला गाणे तयार करून दे. मला काही सुचेना. मी रात्री घरात तानपुरा घेऊन बसलो अन् शेवटी रात्री २ वाजता गाणे रेकॉर्ड करून ते राजीव पाटील यांना मोबाइलवर पाठवले. त्यांना गाणे एवढे आवडले की, त्यांनी संपूर्ण टीमला रात्रीत जागे केले अन् गाणे ऐकवले. ते गाणे ऐकून अक्षयकुमार म्हणाले, हे गाणे असेच चित्रपटात राहू द्या. साध्या माइकवर माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेले ते गाणे चित्रपटात तसेच घेण्यात आले आहे.

Celebrity Reporter - Amit Raj
शब्दांकन : प्रियांका लोंढे

Web Title: Music Experiment in Marathi is a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.