‘संगीतसूर्य' केशवराव भोसले स्मृतिदिन
By Admin | Published: October 4, 2016 10:19 AM2016-10-04T10:19:32+5:302016-10-04T10:21:36+5:30
उत्कृष्ट गायनकला आणि नाट्याभिनय या गुणांच्या आधारे मराठी रंगभूमीवर बालगंधर्वांच्या बरोबरीने स्थान निर्माण करणारे ‘संगीतसूर्य' केशवराव भोसले यांचा आज (४ ऑक्टोबर) स्मृतिदिन
- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ४ - उत्कृष्ट गायनकला आणि नाट्याभिनय या गुणांच्या आधारे मराठी रंगभूमीवर बालगंधर्वांच्या बरोबरीने स्थान निर्माण करणारे ‘संगीतसूर्य' केशवराव भोसले यांचा आज (४ ऑक्टोबर) स्मृतिदिन.
उत्तम तयारीचा आवाज, उत्तम अभिनय-गुण असलेला गुणश्रेष्ठ कलावंत आणि स्वतःबरोबर इतरांना पुढे घेऊन जाण्याची वृत्ती असलेला, आपल्या सहकार्यांची काळजी घेणारा नाट्यसंस्थाचालक या शब्दांत केशवराव भोसले यांचे वर्णन करता येईल. जो मोठा असेल त्याच्याकडून भरभरून घ्यावे आणि आपल्याकडचे लोकांना भरभरून द्यावे या उदात्त वृत्तीची जोपासना केशवरावांनी आयुष्यभर केली.
९ ऑगस्ट १८९० साली कोल्हापुरात जन्मलेल्या केशवरावांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून स्वदेशहितचिंतक नाटकमंडळीमध्ये प्रवेश केला. शारदा नाटकातील ‘मूर्तिमंत भीती उभी’ या पदाने त्यांना प्रसिध्दी मिळवून दिली. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळी येथे ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. यांचे पहिले नाटक ‘संगीत सौभद्र’ १९०८ रोजी हुबळीतील गणेशपेठ नाट्यमंदिरात सादर झाले. पुढे या नाटकाचे प्रयोग पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी झाले. या नाटकाला रसिकांनी, मान्यवरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले व तेव्हापासून केशवरावांचे नाव महाराष्ट्रात निनादू लागले. केशवरावांच्या खाजगी मैफिलीही कोल्हापुरात अतिशय रंगत असत.
त्यांनी संस्कृत भाषेतील शांकुतलमध्येही काम केले. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या त्यांच्या नाटकाचा प्रथम प्रयोग मुंबईत केला गेला. त्या प्रयोगाच्या वेळी मखमलीचा पडदा मराठी रंगभूमीवर सर्वप्रथम लावला गेला. नेहमीच वक्तशीरपणा कटाक्षाने सांभाळणार्या केशवरावांनी ‘संगीत सौभद्र’ नाटकातील तुळशी वृंदावन, पडद्यांची सजावट, गाण्याच्या वेळी साथीस फिडल् (हे वाद्य) घेणे असे वेगळे काहीतरी करण्यावर, नवनव्या प्रयोगांवर भर दिला. १९२१ साली, शंभर रुपये तिकीट लावून, बालगंधर्व यांच्याबरोबर केलेल्या ‘संयुक्त मानपमान’ च्या पहिल्याप्रयोगाच्या वेळी त्यांच्या लोकप्रियतेने कळस गाठला होता. बालगंधर्वांच्या गाण्यातील लालित्य अलौकिक होतेच, पण केशवरावही त्यांचे प्रतिस्पर्धी, किंबहुना त्यांच्या तोडीचे मानले जात. केशवरावांचेही स्वरांवरील आणि शब्दोच्चारावरील प्रभुत्व अलौकिक होते. पं. रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले होते.
मामा वरेरकरांच्या ‘संगीत संन्यासाचा संसार’ या नाटकात त्यांनी केलेली डेव्हिडची भूमिका केवळ अवर्णनीय व अविस्मरणीय ठरली. राजर्षी शाहू महाराजांच्या विनंतीवरून कोल्हापूर येथील पॅलेस एरिना येथे संगीत मृच्छकटिक नाटकाचा पहिला ओपन एअर (खुल्या सभागृहातील) प्रयोगत्यांनी केला. नागपूरला ‘हाच मुलाचा बाप’ हे मामा वरेरकरांचे गद्य नाटक त्यांनी संगीत रूपात सादर केले. सतत काहीतरी वेगळे, भव्य दिव्य करण्याची धडपडच ह्यावरून दिसून येते. ह्या धडपडीचे चीज झाले. त्यांच्या संगीताच्या अविश्रांत सेवासाधनेबद्दल ‘संगीतसूर्य’ ही मानाची पदवी त्यांना बहाल करण्यात आली. त्याआधी १९१३ साली गॅझेट ऑफ इंडियाचे संपादक गॉर्डन यांच्या हस्ते केशवरावांचा सुवर्णपदक, महावस्त्र देऊन सत्कार केला गेला होता. त्या वेळी पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे केशवरावांच्या गानकौशल्याबाबत गौरवपूर्ण भाषण झाले. हा सर्व सत्कार केशवरावांनी नम‘पणे गुरुवर्य जांभेकर बुवांच्या चरणी अर्पण केला. केशवरावांच्या अल्पशा कारकीर्दीत त्यांना राजर्षी शाहूंनी मोलाचे सहकार्य केले.
१९२१ सालच्या ‘संगीत शहा शिवाजी’ या नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका त्यांची रंगभूमीवरील शेवटची भूमिका ठरली. केशवरावांनाअवघे ३१ वर्षांचे आयुष्य लाभले. ४ ऑक्टोबर १९२१ साली त्यांचे निधन झाले. संगीत क्षेत्र व नाट्यभूमीच्या क्षितीजावर हा तारा क्षणमात्र झळकला अन् अकस्मात काळाने झाकाळूनही टाकला असे खेदाने म्हणावे लागते. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या माध्यमातून ह्या श्रेष्ठ कलावंताची स्मृती चिरंतन करण्यात आली आहे.
सौजन्य : मनसे.ऑर्ग