संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 09:06 PM2021-03-29T21:06:44+5:302021-03-29T21:11:33+5:30
Musician singer Saleel Kulkarni tested positive for coronavirus: सलील कुलकर्णी कोरोना पॉझिटिव्ह; फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती
मुंबई: संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. (Musician singer Saleel Kulkarni tested positive for coronavirus)
'सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच आयसोलेट करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले आहेत. गेल्या एका आठवड्यात जे जे भटले त्यांना कल्पना असावी या दृष्टीनं ही पोस्ट,' असं सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब अशी की, रविवारी ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते. अर्थात आजची आकडेवारी देखील चिंतादायक असली तरी कालच्या आकडेवारीपेक्षा जवळपास ९ हजारांनी आज कमी रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आज ३१ हजार ६४३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २० हजार ८५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांचा आकडा २७ लाख ४५ हजार ५१८ इतका झाला आहे. तर २३ लाख ५३ हजार ३०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५४ हजार २८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ३ लाख ३६ हजार ५८४ सक्रिय रुग्ण आहेत.