मुंबई मेरी जान

By Admin | Published: September 3, 2016 02:34 AM2016-09-03T02:34:17+5:302016-09-03T02:34:17+5:30

तनिषा चॅटर्जी नुकतीच ब्रेट लीसोबत ‘अनइंडियन’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर ती आता ‘आयलंड सिटी’ या चित्रपटात विनय पाठक आणि

My dear | मुंबई मेरी जान

मुंबई मेरी जान

googlenewsNext

तनिषा चॅटर्जी नुकतीच ब्रेट लीसोबत ‘अनइंडियन’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर ती आता ‘आयलंड सिटी’ या चित्रपटात विनय पाठक आणि अमृता सुभाष यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तनिषाने सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...

‘आयलंड सिटी’ या चित्रपटाचा भाग तू कशा प्रकारे झालीस?
- ‘आयलंड सिटी’ या चित्रपटाची कथा या चित्रपटाची दिग्दर्शिका रुचिका आॅबेरॉयने विनयला ऐकवली होती. ही कथा ऐकताच त्याला खूप आवडली आणि या चित्रपटातील एका भूमिकेसाठी मी योग्य आहे, असे वाटल्यामुळे त्याने मला कथा ऐकवली व मी या चित्रपटाचा भाग बनले. हा एकच चित्रपट असला, तरी त्यात प्रेक्षकांना तीन वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार आहेत आणि त्या तिन्ही एकमेकींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. अमृता, विनय आणि माझे चित्रीकरण संपूर्णपणे वेगळे झाले आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्ण होईपर्यंत आम्हाला तिघांनाही एकमेकांच्या कामाविषयी उत्सुकता होती.
तुझ्यासाठी सर्वांत जवळचे शहर कोणते?
- मी लहानाची मोठी दिल्लीत झाले; पण मुंबई हे माझ्या खूप जवळचे आहे. मुंबईत मी सगळ्यात पहिल्यांदा आले, त्या वेळी मला हे शहर अजिबातच आवडले नव्हते. पण, मुंबईत राहिल्यावर मला हे शहर माझ्या जवळचे वाटू लागले. या शहराची, शहरात राहणाऱ्या लोकांची एनर्जी मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या शहरात तुम्ही राहायला लागल्यावर या शहराची तुम्हाला इतकी सवय होते, की या शहराशिवाय तुम्ही राहूच शकत नाही.
तुम्ही शहरात राहत असताना अनेक स्तरांतील लोक तुमच्या संपर्कात येत असतात; पण आपण अनेक वेळा आर्थिकदृष्ट्या आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या लोकांपासून दोन हात दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. तुझा याविषयी अनुभव काय आहे?
- मुंबई हे शहर सगळ्यांना आपलेसे करणारे आहे. इथे राहाणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही तरी काम मिळते. आपल्या घरामध्ये काम करणारे, इस्त्रीवाला, दूधवाला यांच्याशी बोलताना त्यांच्या समस्या आपल्याला नेहमीच कळतात. पण, अनेक वेळा आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते, जातीमुळे जितकी लोकांमध्ये दरी नसते त्यापेक्षा कित्येक पटींनी आर्थिक परिस्थितीमुळे लोकांमध्ये दरी निर्माण झालेली असते. ती दरी कमी करण्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. बाहेरदेशातून येणारे लोक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांशी अतिशय चांगले वागतात, ही गोष्ट आपण त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.
तुझे चित्रपट हे नेहमीच मनोरंजक चित्रपटांपेक्षा वेगळे असतात, याचे कारण काय?
- मला पॅरलल सिनेमामध्ये काम करायचे आहे, असा मी कधीच विचार केला नव्हता; पण नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये शिक्षण घेतल्यानंतर चित्रपटांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. खरे तर मी चित्रपटांमध्ये काम करेन, असे मला कधी वाटले नव्हते. पण, एनएसडीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपण काहीतरी चांगले करावे, असा विचार मी केला. मी पहिला चित्रपट युरोपियन केला. बॉलिवूडप्रमाणे तिथल्या चित्रपटात अभिनेत्रीने सुंदर, आकर्षक दिसावे, अशा गोष्टी नाहीत. त्यामुळे सौंदर्याला महत्त्व दिले पाहिजे, या गोष्टीचा मी कधी विचारदेखील केला नाही. चांगली पटकथा असलेला चित्रपट करायचा, ही एकच गोष्ट डोक्यात ठेवून मी चित्रपट स्वीकारते.

- prajakta.chitnis@gmail.com

Web Title: My dear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.