'कोकणातलं माझं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला'; नारायण राणेंनी सांगितला तो प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:27 PM2023-06-16T12:27:39+5:302023-06-16T12:28:26+5:30
Narayan rane: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. ज्यात नारायण राणे त्यांच्या आयुष्यातला एक भावुक प्रसंग सांगताना दिसत आहेत.
गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते(Avadhoot Gupte)चा खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. हा सीझन खूप चर्चेत आहे. आतापर्यंत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी बरेच खुलासे केले, ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसली. दरम्यान आता आगामी भागात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हजेरी लावली आहे. या भागाचे काही प्रोमो रिलीज करण्यात आले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अवधूत गुप्ते याने इंस्टाग्रामवर नुकताच खुपते तिथे गुप्तेचा प्रोमो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला सल्ला, “सोनं जेव्हा जळतं, तेव्हा जास्त उजळतं”. नक्की पहा ‘खुपते तिथे गुप्ते’ १८ जून, रविवार, रात्री ९ वाजता. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, नारायण राणे अवधूत गुप्तेला सांगत आहेत की, सकाळी चार वाजता माझ्यासोबत एक रवी नावाचा मित्र होता. तो मला उठवायला लागला, म्हणाला तुझं घर जाळलंय, टीव्हीवर दिसतंय. तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला. ते म्हणाले, नारायण मी पाहतोय तुझं घर जळतंय, पण लक्षात ठेव सोनं जेव्हा जळतं, तेव्हा ते जास्त उजळतं. नारायण राणे यांनी त्यांच्या आयुष्यातला एक भावुक असा प्रसंग यावेळी सांगितला.
का जाळलं होतं नारायण राणेंचं कोकणातलं घर?
२००३-०४ चे हे प्रकरण आहे. त्यावेळी छगन भुजबळ गृहमंत्री होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सत्यविजय भिसे यांची रात्री अमानुष हत्या झाली होती. यानंतर सकाळीच कणकवलीतील वातावरण तापले होते. राष्ट्रवादीचे संतप्त कार्यकर्ते मुंबई-गोवा हायवेवर जमले होते. कणकवलीतील राणे समर्थकांची दुकाने फोडली होती. पेट्रोल पंप फोडला होता. यानंतर या जमावाने रेल्वे स्टेशनजवळील नारायण राणेंच्या बंगल्याकडे मोर्चा वळविला होता. तिथे तोडफोड करत बंगला जाळला होता.