नातं प्रेमाचं...

By Admin | Published: November 6, 2016 07:58 AM2016-11-06T07:58:22+5:302016-11-06T07:58:22+5:30

आपल्याला प्रेम करायला शिकवावे लागत नाही. जन्मल्यानंतर लगेच आईच्या उबदार कुशीवर आपण प्रेम करायला लागतो.

My love | नातं प्रेमाचं...

नातं प्रेमाचं...

googlenewsNext

- नेहा जोशी
आपल्याला प्रेम करायला शिकवावे लागत नाही. जन्मल्यानंतर लगेच आईच्या उबदार कुशीवर आपण प्रेम करायला लागतो. मग जसजसे मोठे होतो, तसतसे वेगवेगळ्या व्यक्ती, जागा, वस्तू, घटना यांच्यावर प्रेम करत राहतो आणि प्रत्येक गोष्टीशी एक नाते जोडत जातो. प्रत्येक नात्यात आपला आनंद, समाधान शोधत राहतो. प्रत्येक नाते, त्या नात्याचे आपल्या आयुष्यातले स्थान, व्याप्ती वेगवेगळी असते. काही नाती अपरिहार्य. काही आपसूक निर्माण झालेली, पण काही नाती आपण स्वत: निर्माण करतो. ती टिकावित यासाठी विशेष प्रयत्न करतो. प्रेमाने, काळजीने ती जपतो. कलाकार आणि प्रेक्षक हे नाते असे स्वत:हून निर्माण केलेले असते.
कुठलीही कला ही त्या कलाकाराचं व्यक्त होण्याचं माध्यम असतं. ती त्याच्या स्वत:साठी असतेच, पण जोपर्यंत प्रेक्षक, रसिक त्याचा आस्वाद घेत नाहीत, तोपर्यंत कलेला आणि कलाकाराला पूर्णत्व येतच नाही. ज्या क्षणाला एखादा माणूस आपली कला सादर करण्यासाठी सज्ज होतो, त्याच क्षणाला प्रेक्षक या व्यक्तीबरोबर स्वत:हून नातं निर्माण करतो, तसंच कोणताही माणूस एखाद्या कलेचा आस्वाद घेतो, तेव्हा कलेशी आणि कलाकाराशी नातं निर्माण करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतो. त्या अर्थाने, या नात्यात एक अपरिहार्यता आहे पण that is by choice.
प्रेक्षक-कलाकार हे नातं फार गमतीशीर असतं. आपण एखाद्या व्यक्तीबरोबरच्या नात्यात त्या व्यक्तीशी बोलतो, संवाद साधतो, भेटतो, एकत्र वेळ घालवतो आणि सहवासातून नातं घट्ट होत जातं. त्याची intensity, depth  वाढत जाते. प्रेक्षक कलाकाराला भेटतो, तो त्याच्या कलेच्या माध्यमातून. एखादं चित्र, शिल्प, कविता, नाटक, सिनेमा, गाणं, ही भेट प्रत्यक्ष नसते. वैयक्तिक पातळीवर एकमेकांबद्दलच प्रेम वाढत जातं.
नाटकासारख्या माध्यमात प्रेक्षक आणि कलाकार एकाच वेळी प्रत्यक्ष एका अवकाशात (space मध्ये) असतात.
नाटक संपल्यानंतर प्रेक्षक प्रत्यक्ष भेटायला येतात. कौतुक करतात. त्यांना काय आवडलं, काय नाही, ते अगदी मोकळेपणानं सांगतात. फोटो काढतात. सह्या घेतात. आनंद आणि समाधान मिळतं एक कलाकार म्हणून. याचसाठी केला होता अट्टाहास.. असं वाटतं. प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकाराला बघून अगदी हरखून जातो. केवळ त्याच नाटकातल्या नाही, तर त्याच्या इतरही कामाबद्दल कौतुक करतो.
कधी-कधी काय होतं, पण आपलं नातं नेमकं काय आणि कसं आहे, याचा प्रेक्षकाला विसर पडतो. त्या कलाकारांना टीव्हीवर, सिनेमामध्ये बघून प्रेक्षकाला तो आपल्या अगदी जवळचा, रोजच्या भेटी-गाठीतला एक वाटायला लागतो. कोणत्याही नात्यात समोरच्या व्यक्तीची स्पेस जपणं, त्याचा आदर करणं फार महत्त्वाचं असतं आणि इथेच सगळा घोळ होतो. कलाकार हा कलाकार असण्याव्यतिरिक्त एक माणूसही असतो, हे विसरायला होतं. त्या कलेव्यतिरिक्त त्याचं एक जग आहे, त्यात सुख-दु:ख, विविध समस्या असू शकतात. कधी कलाकार थकलेला असू शकतो, कधी आजारी. याची जाणीव न ठेवल्याने मग कलाकार-प्रेक्षक या नात्यातली मर्यादा ओलांडली जाते. यात कधी कलाकाराचा अपमान होऊ शकतो, तर कधी तो दुखावला जाऊ शकतो, याची जाणीवच प्रेक्षकाला होत नाही आणि मग नातं दूषित व्हायला लागतं.
एक छोटीशी घटना. अगदी माझ्यासमोर घडलेली. नाटकाचा प्रयोग संपला. आमच्या नाटकामधली एक सीनिअर कलाकार खूप आजारी होती. कपडे बदलून, मेकअप काढून ती चक्क चटईवर आडवी झाली. थोडा वेळ बसणंसुद्धा तिला शक्य नव्हतं. एक प्रेक्षक महाशय आले. म्हणाले, त्यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे. त्या आजारी आहेत, उठूसुद्धा शकत नाहीत, असं सांगितल्यानंतर ते म्हणाले, ‘त्यांना झोपू द्या की तसंच. माझ्या मुलाला त्यांच्या शेजारी बसवतो आणि काढतो फोटो.’ यावर हसावं, रडावं, त्यांच्या पायावर डोकं ठेवावं की, अपमान करून त्यांना तिथून हाकलून द्यावं, हेच कळेना मला. फक्त ‘नाही जमणार. प्लीज जा तुम्ही.’ एवढंच बोलू शकले मी... अशी एखादी घटना घडल्यानंतर जर कलाकार प्रेक्षकांशी थोडा तुटक वागला. त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायला त्यांनी नकार दिला, तर ‘या कलाकाराला फार गर्व आहे. माज आलाय’ अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकू येतात. तुम्हीच सांगा, तुमच्या घरी येऊन घरातल्या आजारी माणसाला मी असं म्हणाले तर कसं वाटेल. एक मुस्काटात मारून घरातून हाकलून नाही देणार का तुम्ही मला? कधी एखादा कलाकार काही मानसिक तणावातून जात असेल आणि फोटो किंवा सही द्यायला नाही म्हणत असेल, तर आपण प्रेक्षक म्हणून समजून का घेऊ शकत नाही?
आपल्याला नात्यामधले आपले अधिकार, हक्क कळतात. मग जबाबदारीची जाणीव कशी होत नाही?
खूप आनंद होतो प्रेक्षक भेटल्यानंतर. अगदी त्यानी टीका केली तरीही. आपल्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.
पण प्रेक्षक असा वागला की दु:ख होतं. दुखावलं जातं मन.
कलाकार हा एक माणूस आहे आणि कलाकार प्रेक्षक या नात्यामधलं प्रेम जपलं जावं, वाढत राहावं असं वाटत असेल, तर प्रेक्षकांनी या नात्यातल्या मर्यादा पाळायला हव्यात. हे सांगण्यासाठी खरं तर हा सगळा खटाटोप.
>अवघ्या १०-१५ फुटांवर जिवंत कलाकार काम करत असतो. त्याचं हसणं, रडणं, चिडणं, उड्या मारणं सगळं प्रत्यक्ष असतं. अगदी डोळ्यातलं पाणीसुद्धा. कलाकारांसाठीसुद्धा हा फार अनोखा अनुभव. त्यांच्या कामाची दाद अगदी तिथे मिळते. त्या क्षणाला. कलाकारांच्या बरोबरीने हसणाऱ्या, रडणाऱ्या प्रेक्षकांमुळे त्यांचाही उत्साह वाढत असतो. दोघेही एकच अनुभव एकाच वेळी घेत असतात.
एखादा आवडता कलाकार मला भेटल्यानंतर त्याच्याबरोबर घालवलेले काही क्षण मला का पुरत नाहीत? दोन शब्द त्याच्याशी प्रेमाने बोलून माझं समाधान का होत नाही? फोटो आणि सही द्यायला काही हरकत नाही, पण त्याचा अट्टाहास का करावा? फक्त सोशल मीडियावरच्या प्रदर्शनासाठी? सध्या अनेक प्रेक्षक केवळ सही आणि फोटोपुरते जवळ येतात आणि त्या घाईत कलाकाराच्या डोळ्यात बघून २ शब्द बोलायलाच विसरतात. प्रेम व्यक्त करायला खरं तर तेवढंही पुरतं. मग नकोच भेटायला प्रेक्षकांना असं समजा एखाद्या कलाकाराला वाटलं, तर त्यासाठी केवळ त्या कलाकाराला जबाबदार धरणं कितपत योग्य आहे?
(नोव्हेंबर महिन्याची मानकरी असलेली लेखिका प्रसिद्ध अभिनेत्री आहे.)

Web Title: My love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.