काशिनाथ घाणेकर यांची मुलगी रश्मी सांगतेय, बाबा गेल्याचे अनेक वर्षं आईने माझ्यापासून लपवून ठेवले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 02:35 PM2018-10-31T14:35:49+5:302018-10-31T14:37:51+5:30
काशिनाथ घाणेकर यांचे निधन झाले त्यावेळी रश्मी केवळ चार वर्षांची होती. त्यामुळे वडिलांच्या खूपच कमी आठवणी तिच्याकडे आहेत.
डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची मुलगी रश्मी घाणेकरने बाबांसोबतच्या तिच्या अनेक आठवणी शेअर केल्या. काशिनाथ घाणेकर यांचे निधन झाले त्यावेळी रश्मी केवळ चार वर्षांची होती. त्यामुळे वडिलांच्या खूपच कमी आठवणी तिच्याकडे आहेत.
या आठवणींविषयी ती सांगते, बाबा गेले त्यावेळी मी खूपच छोटी असल्याने त्यांच्या खूपच कमी आठवणी माझ्याकडे आहेत आणि त्यातही बाबा गेल्याचे आईने अनेक वर्षं माझ्यापासून लपवून ठेवले असल्याने ती बाबांविषयी माझ्याशी खूपच कमी बोलायची. मी बाबांविषयी विचारले तर बाबा अजून मोठे डॉक्टर बनण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत असे ती मला सांगायची. मी बाबांना पत्र लिहायची, त्या पत्रांवर आईच उत्तरं द्यायची असे अनेक वर्षं सुरू होते. एकदा चूकून घरात कोणकडून तरी बाबा वारले असल्याचे माझ्यासमोर बोलण्यात आले आणि त्यावेळी मला त्यांच्या निधनाबद्दल कळले.
रश्मी तिच्या बाबांसोबत घालवलेल्या अविस्मरणीय आठवणींविषयी सांगते, बाबा माझ्यासोबत खूप मजा-मस्ती करायचे. ते घरात असताना वाचन करायचा हॉलमध्ये एका ठिकाणी बसायचे. मी माझी भातुकली घेऊन त्यांच्या आजूबाजूला ती मांडायची आणि ते देखील माझ्यासोबत खेळायचे. मी जे सांगेन ते करायचे. रोज रात्री ते बेडवर पुस्तक वाचत बसायचे आणि मी त्यांच्या पोटावर बसून खेळायची हे आमचे रोजचे ठरलेले होते. बाबांनी तिसऱ्या वाढदिवसाला एक गुलाबी रंगाचा फ्रॉक मला घेतला होता. तो मला खूपच आवडायचा, मी सगळीकडे तोच ड्रेस घालायला मागयची असे माझी आई सांगते. मी आजही माझा तो ड्रेस जपून ठेवला आहे. मला आई कधी ओरडली तर मी लगेचच बाबांकडे जायची. बाबा घरी असले की ते खांद्यावर नेहमी छोटा टॉवेल ठेवायचे. त्या नॅपकिनच्या टोकने ते आईला मारायचे. त्यावेळी मला प्रचंड आनंद व्हायचा. ते माझे प्रोटेक्टिव्ह वर्ल्ड होते असेच मी सांगेन.