रहस्यकथेचे अफलातून चेकमेट...!
By Admin | Published: January 31, 2017 02:30 AM2017-01-31T02:30:04+5:302017-01-31T02:30:04+5:30
कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांना भिडणाऱ्या किंवा निव्वळ करमणूक करणाऱ्या नाटकांकडे नाट्यरसिकांचा ओढा दिसत असला, तरी रहस्यप्रधान नाटकांना गर्दी करणाराही रसिकांचा एक
- राज चिंचणकर
नाटक - ‘तीन पायांची शर्यत’
कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांना भिडणाऱ्या किंवा निव्वळ करमणूक करणाऱ्या नाटकांकडे नाट्यरसिकांचा ओढा दिसत असला, तरी रहस्यप्रधान नाटकांना गर्दी करणाराही रसिकांचा एक वर्ग आहे आणि त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘तीन पायांची शर्यत’ हे नाटक रंगभूमीवर डेरेदाखल झाले आहे. कथेत रहस्य निर्माण करण्यासाठी जे जे काही लागते; त्याची अचूक पेरणी या नाटकात करण्यात आली असून, या नाटकाने खिळवून ठेवण्याची कामगिरी फत्ते केली आहे. रहस्यप्रधान कथा मांडताना रंगमंचावरच्या पटावर चेकमेट करण्याची किमयाही या नाटकाने साधली आहे.
ज्याच्या मनाचा थांगपत्ता लागणार नाही, अशा वृत्तीचा राजेंद्र हा एक मध्यमवयीन गृहस्थ आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या त्याच्या मुलाला त्या वाटेवरून परावृत्त करण्याची गळ तो एसीपी प्रताप यांना घालतो आणि त्यासाठी तो त्यांना घरी बोलावून घेतो. या राजेंद्रची बायको, ही गुन्हेगारी कथा लिहिणाऱ्या शलाका या लेखिकेची फॅन असते आणि त्या दोघींची भेट घडवून आणण्याच्या निमित्ताने राजेंद्र शलाकालासुद्धा घरी बोलावतो. शब्दखेळात बराच वेळ तो तिला गुंतवून ठेवतो आणि त्याचवेळी घरात एसीपी प्रतापची एन्ट्री होते. या तिघांच्या एकत्र येण्याने पुढच्या नाट्याचा आलेख सतत वर-खाली होत राहतो आणि या शर्यतीत जिंकणार कोण याची उत्कंठा वाढीस लागते.
एका पाश्चात्त्य नाटकावर आधारित लेखक अभिजित गुरू याने हे नाटक लिहिले आहे. ठोस चितारलेली पात्रे, त्या जोडीलाच खटकेबाज संवाद आणि रहस्याची उत्सुकता जास्तीत जास्त ताणली जाईल याची खबरदारी घेत त्याने हे लेखन केले आहे. रहस्यकथेला आवश्यक असलेला वेग या लेखनात आहे, त्यामुळे विचार करण्यासाठी उसंत न देता या नाटकातले प्रसंग दृश्यमान होत जातात. त्यायोगे त्याने केलेली संहितेची मांडणी बोलकी आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या संहितेचे पक्के बांधकाम केले आहे. अवघ्या तीन पात्रांच्या माध्यमातून खिळवून ठेवण्याचे त्यांनी केलेले काम लक्षणीय आहे. प्रत्येक प्रसंगातून नाटकाचा टेम्पो अधिकाधिक वाढत जाईल, याची दक्षता त्यांनी घेतली आहे. नाटकाचे मध्यांतरसुद्धा अचूक नोटवर येते. लेखनात अपेक्षित असलेली गती अखेरपर्यंत राखत, अनपेक्षित अशा वळणावर नाटकाचा शेवट नेल्याने यातले नाट्य थेट अंगावर येते. रहस्य, थरार, कुरघोडी, गुंतागुंत यांचे चांगले एकजिनसीकरण झालेले यात दिसते.
नाटकात असलेली तीन पायांची शर्यत कोण जिंकते हा औत्सुक्याचा भाग असला, तरी अभिनयाच्या पातळीवर या नाटकातल्या तिन्ही कलावंतांनी ही शर्यत जिंकली आहे. मनातल्या विचारांचा अजिबात सुगावा लागणार नाही, असे यातले राजेंद्र हे पात्र रंगवताना संजय नार्वेकर यांनी यात जे काही केले आहे तो निव्वळ अनुभवण्याचा भाग आहे. धूर्त, डोकेबाज आणि तितकेच कावेबाज असे हे पात्र रंगवताना त्यांनी दमदार बॅटिंग केली आहे. शलाका या पात्राचे विविध विभ्रम तेवढ्याच ताकदीने साकारण्याची अफलातून कामगिरी शर्वरी लोहोकरे यांनी केली आहे. या भूमिकेतला त्यांचा कायापालट अचंबित करणारा आहे. त्यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे वळण ठरू शकेल, इतकी ही भूमिका शर्वरीने टेचात उभी केली आहे. लोकेश गुप्ते यांचा एसीपी प्रताप छाप पाडणारा आहे. त्यांच्या मूळ व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल अशीच ही भूमिका असल्याचा थेट फायदा त्यांना झाला असून, हा एसीपी रंगवताना त्यांनी केलेला देहबोलीचा वापर चपखल आहे. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य साकारताना बरेच वेगळे काही देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम रंगसंगती, लेव्हल्सची योग्य मांडणी आणि स्लायडिंग डोअर हे यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भूषण देसाई यांची प्रकाशयोजना आणि राहुल रानडे यांचे पार्श्वसंगीत रहस्यनाट्यासाठी आवश्यक तो परिणाम साधणारे आहे. रहस्यप्रधान नाटके रंगभूमीवर येत नाहीत, अशी रसिकांची ओरड असताना ‘सुयोग’ आणि ‘झेलू’ या दोन संस्थांनी मिळून हे नाटक रंगभूमीवर आणून नाट्यरसिकांची ही मागणी पूर्णत्वास नेली आहे.