नाळ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात केली इतकी बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 10:16 AM2018-11-23T10:16:25+5:302018-11-23T10:18:56+5:30
सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ सारख्या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडीओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी नाळ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
नाळने पहिल्याच आठवड्यात १४ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचा दावा झी स्टुडिओने केला आहे. यावरून या चित्रपटाची प्रेक्षकांसोबत नाळ जुळली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोफळे, सेवा चव्हाण, दीप्ती देवी, ओम भुतकरआणि नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची कथा आहे लहानग्या चैतन्यची. चैतू आठ वर्षांचा आहे. नदीच्या काठी वसलेल्या महाराष्ट्रातील एका दूरच्या खेड्यात तो राहतो. त्याचे वडील गावातील एक प्रतिष्ठित जमीनदार आहेत, ते चैतूचे सगळे हट्ट पुरवतात. प्रेमळ आणि मायाळू आई त्याचे खूप लाड करते. अशा सुंदर वातावरणात वाढणाऱ्या चैतन्यच्या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास नाळच्या कथासूत्रात उलगडताना दिसत आहे.
( Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट )
मृदगंध फिल्म्सचे वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन प्रकाश वैद्य, प्रशांत मधुसूदन पेठे आणि सुधाकर रेड्डी तसेच नागराज मंजुळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांची प्रस्तुती चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सुधाकर रेड्डी यांची असून संवाद नागराज मंजुळे यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन संचारी दास मौलिक यांनी केलंय. सतीश पोतदार, प्रशांत देशमाने यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून अद्वैत नेमलेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. तसेच चित्रपटातील वेशभूषा सचिन लोवाळेकर यांनी साकारली आहे.