'बापल्योक’साठी नागराज मंजुळे अन् मकरंद माने आले एकत्र, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 07:54 PM2023-08-03T19:54:36+5:302023-08-03T19:56:45+5:30

दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक एकत्र आल्याने सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

Nagaraj Manjule and Makarand Mane came together for 'Bapalyok' marathi movie | 'बापल्योक’साठी नागराज मंजुळे अन् मकरंद माने आले एकत्र, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

'बापल्योक’साठी नागराज मंजुळे अन् मकरंद माने आले एकत्र, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

googlenewsNext

आपल्या सशक्त कलाकृतींतून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आणि मकरंद शशिमधू माने ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब, समाजातील वास्तव, सोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ या दोघांनी कायम जपली. चित्रपटसृष्टीतील हे दोन मातब्बर दिग्दर्शक आता ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. 

मनाला भिडणारं कथानक आणि त्यासाठी आवश्यक असणारे कसदार कलावंत ही या दोघांच्या चित्रपटांची कायमच जमेची बाजू राहिली आहे. विशेष म्हणजे ‘बापल्योक’ या चित्रपटातून बाप आणि लेकाचा भावनिक विषय घेऊन येणाऱ्या दिग्दर्शक मकरंद माने यांच्या साथीला लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे उभे राहिले आहेत. २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाविषयी बोलताना नागराज सांगतात, 'सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने चित्रपटातून मांडला गेला नाही. मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटला. ही गोष्ट मला भावली आणि मी चित्रपटासाठी पुढाकार घेतला.'

‘तिरक्या रेघेवरच असतं बापल्योकाचं नातं. ताणलं तर आयुष्यभराचं ताणतं,अन् घावलं तर?...तेच हुडकण्यासाठी आमी समदी एकत्र आलोय’, असं मकरंद माने सांगतात.

‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे.छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत. रंगभूषा संतोष डोंगरे, कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे.

Web Title: Nagaraj Manjule and Makarand Mane came together for 'Bapalyok' marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.