Nagraj Manjule: -तर नागराज मंजुळे आज पोलिस असता... पण...; सांगितला 25 वर्षांपूर्वीचा पडद्यामागचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 12:15 PM2023-01-08T12:15:48+5:302023-01-08T12:17:48+5:30
Nagraj Manjule: 25 वर्षानंतर नागराजने पडद्यामागचा किस्सा सांगितला आणि हे सांगताना तो भावुक झाला....
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे एक अफलातुन व्यक्तिमत्त्व. नागराज हे एक संवेदनशील कवी आहेत. तितकेच उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेते आहेत. त्यामुळे नागराजचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता नागराचा ‘घर बंदुक बिर्यानी’ (Ghar Banuk Biryani) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या सिनेमात नागराज अभिनय करताना दिसणार आहे. तेही पोलिस इन्स्पेक्टरच्या कडक भूमिकेत. कधीकाळी हा नागराज खऱ्या आयुष्यात पोलिस बनणार होता. पण अभिनयाचा किडा असताना पोलिस बनण्यात मन कसं लागणार? यामुळे त्याने चक्क पोलिस प्रशिक्षण केंद्रातूनच पळ काढला होता. आज 25 वर्षानंतर नागराजने हा पडद्यामागचा किस्सा सांगितला आणि हे सांगताना तो भावुक झाला.
होय, अकोला येथे भरलेल्या अखिल भारतीय गझल संमेलनात नागराज मंजुळेने हजेरी लावली. उद्घाटन सोहळ्यात नागराजने त्याच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला. 25 वर्षांपूर्वी अकोल्यातीलच गडंकी भागातील पोलिस प्रशिक्षण केंद्रातून त्याने पळ काढला होता.
काय म्हणाला नागराज..
नागराज म्हणाला, ‘25 वर्षांपूर्वी मी सोलापूरमध्ये पोलिसांत भरती झालो, पुढील प्रशिक्षण अकोल्यात होतं. इथल्या गडंकी पोलिस प्रशिक्षण केंद्रात मी 13 दिवस राहिलो. पण माझं मन काही केल्या लागत नव्हत. त्या दिवशी मी खूप थकलो होतो. दिवसभराचं ट्रेनिंग संपवून मी माझ्या बराकीत झोपायला आलो. पण मन अस्वस्थ होतं. शरीर प्रचंड थकलेलं असूनही काही केल्या झोप येईना... मला सारखं माझं गाव आठवत होतं. आपण इथे पोलिस बनण्यासाठी का आलोत? हा प्रश्न छळत होता. तुला हिरो बनायचं आहे, तू यासाठी जन्मास आला नाही, असं आतून कुणीतरी सांगत होतं. अखेर दुसºया दिवशी मी हा आतला आवाज ऐकला आणि सारं काही सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्या सोबतच्या मित्रांनी मला पाठींबा दिला आणि मी त्या ट्रेनिंग सेंटरमधून पळालो. खºया आयुष्यात पोलिस झालो नाही. पण ते स्वप्न आता सिनेमात पूर्ण करतोय. ‘घर बंदुक बिर्यानी’ या सिनेमात मी पोलिस शिपाई नाही तर थेट इन्स्पेक्टर साकारतो आहे. माझी ती इच्छाही पूर्ण झाली आहे...
यावेळी अकोल्याच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याची इच्छाही नागराजने व्यक्त केली.
‘घर बंदुक बिर्यानी’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे,आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.