Nagraj Manjule : या दोन ऑस्कर विजेत्यांशी नागराज मंजुळेंचं आहे खास कनेक्शन..., तुम्हाला माहितेय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:13 PM2023-03-14T18:13:00+5:302023-03-14T18:15:35+5:30
Nagraj Manjule, Oscars 2023 : यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला. होय, भारताच्या एक नव्हे तर दोन कलाकृतींनी ऑस्कर पटकावला. आता या ऑस्कर विजेत्यांशी असलेलं एक खास मराठमोळं कनेक्शनही समोर आलं आहे....
यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला. होय, भारताच्या एक नव्हे तर दोन कलाकृतींनी ऑस्कर पटकावला. सर्वप्रथम 'द एलिफंट व्हिस्परर्स' या भारतीय लघुपटाने ऑस्कर जिंकला आणि पाठोपाठ 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्करवर नाव कोरलं. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरला. आता या ऑस्कर विजेत्यांशी असलेलं एक खास मराठमोळं कनेक्शनही समोर आलं आहे. होय, दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी त्यांचं ऑस्कर कनेक्शन सांगितलं आहे.
नागराज यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या ऑस्कर कनेक्शनबद्दल लिहिलं आहे.
नागराज यांची पोस्ट
या वर्षीचा ऑस्कर विजेता भारतीय माहितीपट elephant whisper माझी मैत्रीण संचारीनं एडिट केला आहे. 'नाळ' ही संचारीनंच एडिट केली आहे. सुधाकर आणि संचारी खूप खूप प्रेम आणि सदिच्छा.
विशेष म्हणजे नाटू नाटू गाण्याचा गीतकार चंद्रबोस यांनीच GBB मधल्या गुन गुन गाण्याचे तेलगू बोल लिहले आहेत..
यावेळचं ऑस्कर कनेक्शन असं आहे. चांगभलं !, अशी पोस्ट नागराज यांनी शेअर केली आहे.
२०१८ साली नागराज यांचा नाळ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कांती हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते. तर त्यांच्या पत्नी संचारी दास मोलिक यांनी हा सिनेमा एडिट केला होता. याच संचारी यांनीच 'द एलिफंट व्हिस्परर्स' एडिट केला आहे आणि याच 'द एलिफंट व्हिस्परर्स' लघुपटाने ऑस्करमध्ये बाजी मारली आहे. 'गुन गुन' या गाण्याबद्दल सांगायचं तर लवकरच नागराज यांचा घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा प्रदर्शित होतोय. मराठीसह हिंदी,तेलुगू आणि तामिळ भाषेत येऊ घातलेल्या या चित्रपटात 'गुन गुन' हे गाणं आहे. नुकतंच रिलीज झालेल्या या गाण्याचे तेलगू बोल चंद्रबोस यांनी लिहिले आहेत. नाटू नाटू या गाण्याचे बोलही चंद्रबोस यांचेच.
नागराज यांचं हे ऑस्कर कनेक्शन समोर येताच चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. नागराज यांनी शेअर केलेल्या या लेटेस्ट फेसबुक पोस्टवर अनेकांनी कमेंट करत मराठी सिनेमालाही लवकरच ऑस्कर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अण्णा हे connection असंच स्ट्रॉंग होत जाओ!! येत्या दोन चार वर्षात तुम्हाला ऑस्कर घेताना पाहिलं की तमाम मराठी माणसाच्या डोळ्यांचे पारणे फिटतील, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स त्यांच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.