मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 05:15 PM2024-11-28T17:15:40+5:302024-11-28T17:16:17+5:30
प्राजक्ता माळी, अमृता खानविलकरचंही केलं कौतुक
नाना पाटेकर (Nana Patekar) मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते. त्यांचे विचार, त्यांचा अफाट ज्ञान, बोलण्याची शैली, एकापेक्षा एक संवाद सगळंच अद्भूत आहे. वयाच्या ७३ व्या वर्षीही ते प्रेक्षकांवर भुरळ घालत आहेत. 'नटसम्राट' सिनेमातील त्यांच्या कामाची स्तुती करावी तितकी कमीच आहे. लवकरच त्यांचा 'वनवास' सिनेमा रिलीज होणार आहे. यानिमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. एका मुलाखतीत त्यांनी मराठी सिनेमा डब का होत नाही अशी खंत व्यक्त केली.
'अमुक तमुक'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले, "साऊथचे सिनेमे हिंदीत डब झालेले आपण पाहतो. मग मराठी सिनेमे हिंदीत का डब होत नाहीत. साऊथचे काही अतिशय टुकार सिनेमे जे कसे काय चालले आणि का पाहावे असा प्रश्न पडतो ते सिनेमे ओटीटीवर येतात. मराठीत इतकं सकस कंटेंट आहे मग ते का डब होत नाही. काकस्पर्श का डब नाही झाला? काय अप्रतिम काम केलं आहे त्यात कलाकारांनी. आपण व्यवहारात कमी पडतोय का याचा विचार करायला हवा."
ते पुढे म्हणाले, "फुलवंती नावाचा सिनेमा नुकताच आला. पाहताना काय गोड वाटत होता.व्हिज्युअली किती छान दिसत होतं. मग असे सिनेमे का प्रमोट होत नाहीत? व्हायलाच पाहिजेत. आता सिनेमा करताना केवळ मराठीपुरती मर्यादित कथा निवडायची नाही. मराठी सिनेमे इतके छान असताना ते डब का नाही होत? नटसम्राटचे हक्क साऊथने घेतले ना. सगळीकडे हिंदीच नट्या का लागतात. का नाही आपली अमृता, प्राजक्ता, सई यांना का नाही प्रमोट करत? त्यांच्यात ताकद आहे करायला हवं."