Nana Patekar : दहशतवाद्याची भूमिका? नाना पाटेकरांनी थेट नाकारला हॉलिवूडचा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:07 AM2023-02-08T10:07:11+5:302023-02-08T10:07:31+5:30
बॉलिवूड कलाकारांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्यांचं नशीबच उजळलं असं म्हणतात.
टायटॅनिक फेम लिओनार्डो डिकॅप्रिओ (Leonardo DeCaprio) म्हणजे हॉलिवूडचा सुपरस्टार. त्याच्यासोबत स्क्रीनशेअर करण्यासाठी अनेक जण धडपडतात. बॉलिवूड कलाकारांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्यांचं नशीबच उजळलं असं म्हणतात. ही संधी शक्यतो कोणीच जाऊ देत नाही. मात्र मराठमोळ्या नाना पाटेकरांनी (Nana Patekar) चक्क लिओनार्डोचा सिनेमा नाकारला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी नुकताच याचा खुलासा केला आहे.
हॉलिवूड दिग्दर्शक रिडले स्कॉट (Ridley Scott) यांनी नाना पाटेकरांना 'बॉडी ऑफ लाइज' सिनेमा ऑफर केला होता. यामध्ये त्यांना दहशतवाद्याची भूमिका साकारायची होती. मात्र नानांनी दहशतवाद्याची भूमिका करण्यास स्पष्ट नकार देत सिनेमा नाकारला.
लल्लनटॉपच्या मुलाखतीत अनुराग कश्यपला नाना पाटेकरांसोबत कधी काम का नाही केले असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, 'सोबत काम करण्यासंदर्भात आमची अनेकदा चर्चा झाली. निर्माता क्रिस स्मिथ यांना 'द पूल' या सिनेमात एका भूमिकेसाठी नाना पाटेकरांसारख्या कलाकारांची गरज होती. यासाठी ते माझ्याकडे आले होते. क्रिस स्मिथ यांनी वर्णन केलेल्या भूमिकेसाठी नाना पाटेकर एकदम अनुकूल होते. मी स्वत: नानांकडे या रोलसाठी गेलो. नाना सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाला पुरस्कारही मिळाला. नानांच्या सिनेमातील कामामुळे ऑस्कर विजेता रिडले स्कॉट देखील प्रभावित झाले होते. रिडले यांनी द पूल सिनेमा पाहिला आणि मला इमेल केला. त्यांच्या आगामी बॉडी ऑफ लाइज सिनेमात मार्क स्ट्रॉंग या भूमिकेसाठी त्यांना नाना पाटेकरांना घ्यायचे होते. यावर नाना पाटेकरांनी 'दहशतवाद्याची भूमिका आहे ही भूमिका करणार नाही' असे स्पष्ट सांगितले.
बॉडी ऑफ लाइज २००८ मधील स्पाय थ्रिलर सिनेमा होता. यामध्ये लिओनार्डो आणि रसेल क्रो यांची प्रमुख भूमिका होती.