नाशिकची गाथा सांगणार 'नाशिकचा मी आशिक'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:47 PM2018-11-08T15:47:32+5:302018-11-08T15:48:46+5:30
'नाशिकचा मी अशिक' हे नाशिकची गाथा सांगणारे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच जुहू येथील अाजीवासन स्टुडिओमध्ये पार पडले.
केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित 'नाशिकचा मी अशिक' हे नाशिकची गाथा सांगणारे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच जुहू येथील अाजीवासन स्टुडिओमध्ये पार पडले. या गाण्याला प्रसिद्ध गायक प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी आवाज दिला असून दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा बर्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नाशिकमधील पर्यटन स्थळे, दक्षिणोत्तर वाहणारी गंगा, मंदिरांचे कळस, डोंगर दऱ्यांची नक्षी आणि निसर्गरम्य परिसर. आता याच नाशिकला जगाच्या नकाशावर प्रामुख्याने महाराष्ट्राच्या नकाशावर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निर्माता केतनभाई सोमैया 'नाशिकचा मी आशिक' हे नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. गाण्याच्या ओळींवरूनच हे गाणे नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणारे हे समजून येतं. संगीतकार प्रवीण कुवर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणे ध्वनिमुद्रित अवधूत वाडकर यांनी केले आहे. नाशिकच्या भव्यतेचा तसेच निसर्ग सौंदर्याचा विचार करूनच या गाण्याची रचना केली असल्याचे गीतकार मंदार चोळकर सांगतात.
या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बिग बॉस फेम स्मिता गोंदकर तसेच काहे दिया परदेस फेम सायली संजीव आणि नाशिकचे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करणार असून लवकरच नाशिक येथेच या गाण्याच्या चित्रीकरणाचा शुभारंभ केला जाणार आहे.