26 वर्षात पहिल्यांदाच अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 01:52 PM2017-04-07T13:52:48+5:302017-04-07T14:28:57+5:30
64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून अक्षय कुमारला ‘रुस्तम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - कॉमेडी असो वा चरित्र चित्रपट...दर चित्रपटातून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणा-या खिलाडी अक्षय कुमारसाठी 2017 त्याच्या कारकिर्दीतील महत्वाचं वर्ष ठरलं आहे. फिल्मफेअरपासून ते इतर छोट्या मोठे सर्व पुरस्कार पटकावणा-या अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नुकतंच 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून अक्षय कुमारलाही ‘रुस्तम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होती. प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित या चित्रपटात अक्षय कुमारने नेव्ही ऑफिसर रुस्तम पावरीची प्रमुख भूमिका साकारली होती. आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती मिळाल्यानंतर रुस्तम म्हणजेच अक्षय कुमारने तिच्या प्रियकराची केलेली हत्या आणि त्याच्यावर चालवण्यात आलेला खटला, ज्याला लागलेलं देशभक्तीचं वळण अशी या चित्रपटाची कथा आहे. चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त एलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, उषा नाडकर्णी हे कलाकार झळकले होते.
पुरस्कार घोषित झाल्यानंतर अक्षय कुमारने ट्विटर आणि फेसबूकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्याने आपल्या कुटुंबासोबत चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून सलग सुपरहिट चित्रपट देत आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट वेगळ्या विषयावर आधारित असून त्यातून सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. यामध्ये देशभक्तीपर चित्रपटांचा समावेश जास्त असून हॉलिडे, बेबी, स्पेशल 26, एअरलिफ्ट हे चित्रपट प्रचंड गाजले. आपल्या प्रत्येक चित्रपटासोबत अक्षय आपली खिलाडी ओळख पुसताना दिसत असून एक उत्तम अभिनेता म्हणून समोर येत आहे. फक्त अभिनेता नाही तर त्याचं सामाजिक भानही चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्यांचं कौचुकही केलं जात आहे.
2011 मध्ये अक्षय कुमारचा ‘पद्मश्री’ने गौरव करण्यात आला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.
या चित्रपटांना मिळाले राष्ट्रीय पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - कासव (सुवर्णकमळ)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - नीरजा
- सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस - शिवाय
- सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग - व्हेंटिलेटर
- साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
- फिल्म फ्रेंडली राज्य - उत्तरप्रदेश