राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय, पण राहायला घरच नाही, ‘रेखा’ची परवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:17 AM2023-08-26T10:17:48+5:302023-08-26T10:17:48+5:30

तमाशात काम करून उदरनिर्वाह

National award is getting, but there is no house to live in, the affordability of 'Rekha' | राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय, पण राहायला घरच नाही, ‘रेखा’ची परवड

राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय, पण राहायला घरच नाही, ‘रेखा’ची परवड

googlenewsNext

दत्ता पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव (जि.सांगली) : ‘रेखा’ लघुपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी माया पवार ही तासगावातच समाजाने उपेक्षित ठेवलेल्या पारधी कुटुंबातील एक मुलगी. राहण्यासाठी हक्काचे घर नाही. जागरण गोंधळ आणि संधी मिळालीच, तर तमाशात काम करून उदरनिर्वाह करते. मायाच्या घरी सहा-सात बहिणी आणि आई-वडील असे कुटुंब. मात्र दोन वेळच्या खाण्यासाठीदेखील परवड आहे.
तासगाव तालुक्यातील डोंगराळ पेड येथील सामान्य कुटुंबातील उमद्या दिग्दर्शकाने बनवलेल्या ‘रेखा’ या लघुपटाला ६९ वा ज्युरी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याने रेखाच्या प्रत्यक्ष जीवनातील चित्तरकथा उजेडात आली आहे. दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी लघुपटात काम करण्यासाठी तिला लॉकडाउनच्या काळात विचारणा केली. कुठलाच अनुभव गाठीशी नसताना केवळ रणखांबे यांनी दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर तिने अभिनयाचा कसून सराव केला.

झगमगाटातही पोटाची भ्रांत कायम...

रेखा लघुपटाला देश-विदेशात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून माया पवारलादेखील मिळाले. अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या उपस्थितीत झोपडीतील रेखा गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली. मात्र प्रसिद्धीच्या झगमगटातदेखील ती उपेक्षित आयुष्य जगत आहे.

मायाने उमटवला ठसा 

रेखाच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा अभिनेत्रीचा शोध सुरू होता. प्रत्यक्षात या परिस्थितीतून गेलेली तरुणी अभिनेत्री हवी होती. हा शोध मायाच्या माध्यमातून पूर्ण झाला. दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतर, मायानेदेखील प्रचंड मेहनत घेऊन अभिनेत्री म्हणून ठसा उमटवला, असे या लघुपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी सांगितले. 

वडिलांच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे दर दिवशी गाव बदलून राहायला लागायचे. परिस्थितीमुळे शाळा सोडून जागरण, गोंधळ करून गुजराण सुरू आहे. चित्रपटात काम करायला मिळेल हे स्वप्नात देखील पाहिले नव्हते. मात्र या चित्रपटामुळे माणसं आम्हाला ओळखायला लागली. इतकी वर्ष माणूस असून पण माणसात नव्हतो. या चित्रपटामुळे आम्हाला माणूसपण मिळालं.
- माया पवार, रेखा लघुपटातील मुख्य अभिनेत्री

 

Web Title: National award is getting, but there is no house to live in, the affordability of 'Rekha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.