Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?

By कोमल खांबे | Published: October 5, 2024 11:49 AM2024-10-05T11:49:12+5:302024-10-05T11:57:05+5:30

अभिनेत्री ते शेतकरीण बाई! मुंबई सोडून मृण्मयीने का धरली गावाकडची वाट? जाणून घ्या तिचा प्रवास 

Navratri Special mrunmayee deshpande actress to farmer journey said we need to change perspective for agriculture | Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?

Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?

मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून मृण्मयीने तिची छाप पाडली. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम गायिकाही आहे. कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणारी मृण्मयी सध्या तिची एक वेगळी ओळख जपत आहे. मुंबई सोडून दूर महाबळेश्वराला निर्सगाच्या सानिध्यात मृण्मयी स्थायिक झाली आहे. तिथे मृण्मयी शेतीदेखील करते. नवरात्र स्पेशल नवदुर्गा या विशेष सदरात मृण्मयीने अभिनेत्री ते शेतकरी बनण्याचा प्रवास 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना उलगडला.

अजूनही अभिनेत्रीला  एका चौकटीत बसवलं जातं, असं वाटतं का? 

प्रत्येकाचं दिसणं वेगळं असतं आणि प्रत्येक भूमिकेची गरजही वेगळी असते. सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार तुम्हाला तसे चेहरे शोधायला लागतात. केवळ चांगलं दिसणं याच्यापलिकडे इंडस्ट्री गेलेली आहे. सगळ्याच अभिनेत्री सुंदरच आहेत. कशा पद्धतीने तुम्ही स्वत:ला प्रेझेंट करता त्यानुसारच कास्टिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या डोळ्यांमध्ये दिसला पाहिजे. पण, जेव्हा एखाद्या भूमिकेसाठी कास्टिंग केलं जातं. तेव्हा त्या भूमिकेत फिट बसणारी व्यक्तीच कास्ट करावी लागते. नाहीतर तुम्ही सिनेमा बनवू शकत नाही. प्रेक्षकांनाही कनेक्ट वाटला पाहिजे. आता बॉडीशेमिंग वगैरे कोणी करत नाही. आता इंडस्ट्रीमध्ये हा मुद्दा राहिलेला नाही. तुमच्या कामावरुन  तुम्हाला कास्ट केलं जातं.

अभिनयाव्यतिरिक्तही तू बरंच काही करतेस. महाबळेश्वरमध्ये तुमचं घर आहे आणि तिथे तुम्ही शेतीही करता. मुंबई सोडून महाबळेश्वरमध्ये जावंसं का वाटलं? यामागे नेमका काय विचार होता?

मुंबई सोडायचा निर्णय आम्ही फार आधीपासूनच घेतला होता. अजूनही माझी मुंबई सुटलेली नाही. कारण, कामानिमित्त माझं येणं जाणं असतंच. पण, खरं सांगायचं तर शहरांची कंबरडी मोडलेली आहेत. ज्यांना ज्यांना इतर ठिकाणी जाऊन राहणं शक्य आहे. त्यांनी खरंच रस्ता धरला पाहिजे. दुसरं म्हणजे आम्हाला आमचं खाणं स्वत: पिकवून खायचं होतं. कायमच आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आयुष्य जगायची इच्छा होती. आणि ज्यांना ज्यांना हे करायचं आहे,त्यांना आमच्याकडून प्रेरणा मिळावी हादेखील मुद्दा होता. 

तू याआधी कधी शेती केली होतीस का? हे सगळं करताना काय अडचणी आल्या?

याआधी मी कधीही शेती केलेली नव्हती. माझा नवरा स्वप्निल गेली ८-९ वर्ष याचा अभ्यास करत आहे. महाबळेश्वरला एका शेतात आम्ही काम करायला गेलो होतो. तिथे आम्हाला ही जागा आवडली. त्यानंतर आम्ही महाबळेश्वरला शिफ्ट झालो. तिथे आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे. फारशी माणसं नाहीत आणि आम्हाला अशीच जागा हवी होती. हे सगळं करताना खूप अडचणी येतात. शेतीच्या कामासाठी माणसं मिळत नाहीत. पण, एखादी गोष्ट ठरवली की त्याच्यावर मात करत पुढे जाणं हे निसर्गच आपल्याला शिकवतं.

या सगळ्या प्रयोगादरम्यान लक्षात राहणारा असा एखादा अनुभव आहे का? 

तुम्ही मातीशी जोडले गेलात की एक नवं दालन तुमच्यासाठी खुलं झालेलं असतं. त्यामुळे खूपच वेगवेगळे अनुभव येतात. आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा पालक आणि मेथी लावली होती. जेव्हा आम्ही आमच्या शेतातली पालक आणि मेथीची भाजी खाल्ली तेव्हा जो पोट भरण्याचा अनुभव होता. जी चव होती ती शब्दांत सांगता येण्यासारखी नाही. पहिल्यांदा कळलं की एवढंसं काहीतरी उगवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. 

भारत हा कृषीप्रधान देश आहे. पण,अजूनही शेतीकडे तितकं प्रगल्भतेने बघितलं जात नाही असं वाटतं का? 

हो, सगळी गाव ओसाड पडली आहेत. पारंपरिक पद्धतीची शेती आता होत नाहीये. सगळे जण शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गावात सगळीकडे म्हातारी माणसच राहिली आहेत. त्यांची मुलं वगैरे सगळी शहरात आहेत. त्यामुळे जमीन कसायला माणसंच मिळत नाहीत. त्यामुळे शेतीच्या पद्धतीही बदलल्या आहेत. यावर एका डॉक्युमेंट्रीचंही माझं काम सुरू आहे. आमच्या माध्यमातून जास्तीस जास्त लोकांपर्यंत गोष्टी पोहचवून त्यांना प्रेरित करायचं काम करायचं आहे. 

एका आमदाराने नुकतंच असं वक्तव्य केलं की अगदी साधी मुलगी शेतकरी मुलाला मिळते. शेतीबद्दल हा माइंड सेट बदलण्याची गरज आहे, असं वाटतं? अजूनही त्याच चष्म्यातून शेतकऱ्याकडे बघितलं जातं असं वाटतं?

त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे, असं मी म्हणणार नाही. कारण, शेतकरी नवरा कुणालाच नको आहे. लोकांची कष्ट करण्याची तयारी कमी झालीये. गावात जाऊन शेतीत राबण्यापेक्षा साध्या गोष्टींमधून पैसा मिळतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे जेव्हा भारतातला शेतकरी श्रीमंत होईल. तेव्हा भारतातल्या निम्म्या अडचणी संपलेल्या असतील. 

शूटिंग आणि या सगळ्यात तू समतोल कसा साधतेस?

आता मी महाबळेश्वरला राहते. त्यामुळे कामानिमित्त मुंबई, पुणे सुरू असतं. पण, हे सगळं कसं मॅनेज होतं हे मलाही खरंच माहीत नाही. 

काम केल्यानंतर मागूनही कित्येकदा पैसे मिळत नाहीत, अशी कलाकारांची तक्रार असते. तुला असा अनुभव आलाय का? 

यासाठी कलाकारांमध्ये युनिटी हवी. आधीच्या सिनेमातील कलाकारांचे पैसे अडकवले असतील तर पैसै परत केल्याशिवाय त्यांच्याबरोबर काम न करणं आणि त्यांना बॉयकॉट करणं हा एकमेव पर्याय आहे. माझे स्वत:चे खूप जास्त पैसे अडकले आहेत. बुडाले आहेत. ते फोन उचलत नाहीयेत. मी पण सोशल मीडियावर हे मांडण्याचा विचार करत होते. पण, त्याने काहीच साध्य होणार नाही. यासाठी सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन तक्रार वगैरे केली तर काहीतरी होऊ शकतं. 
 

Web Title: Navratri Special mrunmayee deshpande actress to farmer journey said we need to change perspective for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.