नवाजुद्दीनला खुणावतेय मराठी इंडस्ट्री!
By Admin | Published: June 30, 2017 02:32 AM2017-06-30T02:32:18+5:302017-06-30T02:32:18+5:30
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने विविध आव्हानात्मक भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने विविध आव्हानात्मक भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीसह काम करण्याची संधी नवाझुद्दीनला मिळाली असून त्याचा लुकही पूर्णपणे वेगळा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न : श्रीदेवी यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली. एक स्वप्न पूर्ण झालं, असं म्हणता येईल का?
- ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’ मध्ये असल्यापासून श्रीदेवी यांचा फॅन होतो. त्यांचे सिनेमा आवर्जून पाहायचो. ‘चाँदनी’ आणि ‘चालबाज’ यासारख्या कमर्शियल सिनेमात त्यांनी काम केलं, तसंच ‘सदमा’ आणि ‘लम्हे’ यासारख्या सिनेमातूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यामुळेच श्रीदेवी यांच्या अभिनयाचा फॅन होतो. त्यांची सिनेमांची निवड मला विशेष भावली. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आणि स्वप्न होते ते या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाले. श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने लगेच होकार दिला. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी यांच्याकडून बऱ्याच नव्या गोष्टी शिकायलाही मिळाल्या. त्यांची कामाबद्दलची आवड, प्रेम, निष्ठा सारं काही वाखाणण्याजोगं आहे. स्वत:च्या कामातील परफेक्शसोबतच आपल्या सहकलाकारांच्या कामातील परफेक्शनसाठी त्या झटत असतात. आपल्या सहकलाकारांना त्या वेळोवेळी मार्गदर्शन करतात. मग ते डायलॉग असो किंवा चेहऱ्यावरील हावभाव असोत, प्रत्येक बारीकसारीक गोष्ट त्या समजावून सांगतात. सिनेमाच्या सेटवर मलाही त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. त्यांनी दिलेल्या टिप्स मला सिनेमातच कामी आल्या असं नाही, तर भविष्यातील प्रत्येक भूमिका साकारण्यासाठी कामी येणार आहेत.
प्रश्न : सिनेमा यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात आणि कोणता सिनेमा ग्रेट समजावा?
- सिनेमाच्या यशासाठी काही विशेष फॉर्म्युला आहे, असं मला वाटत नाही. सिनेमाचं यश हे सर्वस्वी मायबाप रसिक प्रेक्षकच ठरवतात. रसिकांना भावणारी कथा सिनेमातून सादर केली की, आपसुकच रसिक त्याकडे आकर्षित होतात. मात्र, गेल्या काही वर्षांत पाहिलं तर आणखी एक नवा ट्रेंडही रूढ होतोय. हल्ली प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं तरच तो सिनेमा ग्रेट समजला जातो.
प्रश्न : या सिनेमात तुझा लूक पूर्णपणे वेगळा आहे आणि ‘मंटो’ सिनेमातही आगळावेगळा लूक. त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली? वेगळ्या लूकमुळे सिनेमा स्वीकारले का?
- प्रत्येक सिनेमात मी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. सिनेमांतील भूमिकांमध्ये प्रयोग करणे मला भावते. सामान्यपणे एखाद्या सिनेमाचा लुक ठरतो आणि त्यानुसार कलाकार स्वत:ला
त्या भूमिकेसाठी तयार करत असतो. मात्र, या सिनेमातील
लूकबाबत सांगायचं झालं तर दिग्दर्शक रवी उदयवार यांच्या
मनात काहीतरी वेगळंच होतं. आम्ही वेगवेगळे लुक ट्राय केले.
ती व्यक्तिरेखा कशी असेल, त्याचे बोलणे आणि चालणे तसंच
हावभाव या सगळ्या गोष्टी आम्ही पडताळून पाहिल्या आणि लुकवर शिक्कामोर्तब झालं. मेकअपसाठी आम्ही प्रोस्थेटिकचा वापर केला आणि सगळ्या प्रक्रियेसाठी जवळपास तीन तास जात असत आणि मेकअप काढण्यासाठी तेवढाच वेळ लागायचा. मुंबई आणि दिल्लीच्या डाक्याच्या उन्हात त्या मेकअपसह वावरायचो. लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरील ‘मंटो’ सिनेमातही असाच वेगळा लुक केला होता. या लुकसाठी दिग्दर्शिका नंदिता दास यांची मदत झाली. मंटोची भूमिका साकारण्यासाठी बरीच मानसिक तयारीही करावी लागली.
प्रश्न : बॉलिवूडच्या तिन्ही खानांसह तू काम केलं आहेस, तुझ्या मते, कोणता खान बेस्ट आहे?
- बॉलिवूडचे तीन खान- शाहरुख, आमिर आणि सलमान यांच्यासह काम करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. या तिघांसह काम करण्याची संधी मला लाभली. ‘सरफरोश’मध्ये आमिर, ‘किक’ तसंच ‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान आणि रईसमध्ये शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली. या तिघांसोबत काम करण्याची मजा काही औरच असते. प्रत्येक खानची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाच्या अभिनयाची विशेषता आणि खासियत आहे. त्यामुळे तिन्ही खान बेस्ट आहेत.
प्रश्न : नवाजुद्दीन सिद्दिकी मराठी सिनेमा फॉलो करतो का आणि तो मराठीत काम करणार का?
- ‘सैराट’सारखाच मराठी
सिनेमा करायला नक्कीच आवडेल. सैराट सिनेमा पाहिल्यानंतर त्यानं मला याड लावलं आहे. त्यामुळे असाच सिनेमा मिळाला तर मराठीत काम करेन. सैराट सिनेमानं मराठी चित्रपटसृष्टीला
वेगळ्या उंचीवर नेऊन
ठेवलं आहे. याशिवाय दिग्दर्शक नागराज
मंजुळेनं त्याचा एखादा सिनेमा आॅफर केला
तर त्यालाही मी तत्काळ होकार देईन. कारण नागराजचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. सैराट या सिनेमासोबत कोर्ट आणि किल्ला हे सिनेमाही मी पाहिले आहेत.