The Kashmir Files : त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवला; काश्मीर फाईल्सवर नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:04 PM2022-03-27T17:04:54+5:302022-03-27T17:05:39+5:30
दिग्दर्शकानं आपल्या दृष्टीकोनातून चित्रपटाची निर्मिती करण्याच्या अधिकाराचं नवाझुद्दीन सिद्दीकीकडून समर्थन.
The Kashmir Files Vivek Agnihotri : सध्या काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे, तर काही जणांनी या चित्रपटावर टीकाही केली आहे. आता बॉलिवूडचा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यानं या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शकानं आपल्या दृष्टीकोनातून चित्रपटाची निर्मिती करण्याच्या अधिकाराचं त्यानं समर्थन केलंय.
तू हा चित्रपट पाहशील का? असा प्रश्न नवाझुद्दीन सिद्दीकीला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना "लोक हा चित्रपट पाहत आहे, तर मीदेखील तो पाहिन," असं उत्तर त्यानं दिलं. बॉलिवूडमधील एक गट या चित्रपटाच्या विरोधात आहे का? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. "याबद्दल मला काही कल्पना नाही. परंतु चित्रपट तयार करण्याची प्रत्येक दिग्दर्शकाची एक पद्धत आणि दृष्टीकोन असतो. त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून चित्रपट तयार केला आणि पुढेही दिग्दर्शक आपल्याच दृष्टीकोनातून चित्रपट तयार करतील. मी हा चित्रपट पाहिला नाही, परंतु चित्रपटात काही गोष्टी जोडल्याही जातात. परंतु दिग्दर्शक जेव्हा अशाप्रकारचा चित्रपट तयार करतो, तेव्हा त्यांनी सत्य पडताळचं असेल हे नक्की," असंही तो म्हणाला.
२०० कोटींचा टप्पा पार
'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. १५-२० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रटानं १५ दिवसांमध्ये २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. विकेंडसोबतच अन्य दिवसांतही या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे.
हिरोपंती २ मध्ये दिसणार नवाझ
नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सुधीर मिश्रा यांच्या 'सीरिअस मेन' यात नवाझुद्दीन सिद्दीकी दिसला होता. त्यानंतर आता तो २९ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या हिरोपंती २ या चित्रपटातही तो झळकणार आहे. याशिवाय त्यानं कंगना रणौत प्रोडक्शनचा चित्रपट 'टीकू वेड्स शेरू'चं कामही पूर्ण केलंय.