तीन वर्षांत मोडला संसार! अखेर नीना गुप्तांची लेक मसाबाचा घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 10:17 AM2020-03-02T10:17:58+5:302020-03-02T10:18:08+5:30
मसाबा गुप्ता हिने अखेर पती मधु मंटेनासोबत घटस्फोट घेतला.
दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची लेक मसाबा गुप्ता हिने अखेर पती मधु मंटेनासोबत घटस्फोट घेतला.
मसाबाचा पती मधु मंटेना एक निर्माता आहे. गतवर्षी मार्च महिन्यात मसाबा आणि मधु यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोन वर्षाआधी ऑगस्ट महिन्यात एक अधिकृत निवेदन जारी करून पतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय जाहिर केला होता. अर्थात हे एक ‘ट्रायल सेपरेशन’ होते.
‘मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून अनेक विचारांती आम्ही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वत:ला खासगी आयुष्यात काय हवे, यामुळे अनावश्यकरित्या आमच्या लग्नावर व प्रेमावर दबाव जाणवत होता. त्यामुळे आम्ही ट्रायल सेपरेशन घेण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही काही काळ या लग्नापासून दूर राहू आणि आम्हाला आयुष्यात काय हवे, हे समजून घेऊ. हा आमच्यासाठी कठीण निर्णय आहे. आमच्या खासगीपणाचा आदर केला जावा, ही अपेक्षा’, असे मसाबाने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
‘ट्रायल सेपरेशन’च्या या निर्णयानंतर सात महिन्यांनी मसाबाने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मसाबाचा हा निर्णय सर्वांसाठीच शॉकिंग होता.
मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते. मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झालेले नाही. मधु मंटेना फँटम फिल्म्सचा को-फाउंडर आहेत. त्याने गजनी, रण, रक्त चरित्र, झुठा ही सही, मौसम या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मसाबाचे म्हणाल तर ती बॉलिवूडची एक यशस्वी फॅशन डिझाईनर आहे.
नीना गुप्तांसाठी होता मोठा धक्का
मधुपासून विभक्त होण्याचा लेक मसाबाचा निर्णय नीना गुप्तांसाठी धक्कादायक होता. एका मुलाखतीत त्या याबद्दल बोलल्या होत्या. ‘एक आई या नात्याने मी मसाबाला समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता. घाई करू नकोस, विचारपूर्वक निर्णय घे, असे मी तिला सांगितले होते. कारण आम्हाला मधु आवडतो. तो एक चांगला माणूस आहे. पण काहीही तोडगा निघाला नाही. तिने घटस्फोटाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला. पण तरीही तिचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता,’ असे नीना यांनी सांगितले होते.